पंचायत क्षेत्रातील एकूण एक सरकारी शाळा बंद; वापर फक्त मतदाना दिवशी मतदान केंद्र म्हणून
By आप्पा बुवा | Published: July 12, 2023 06:37 PM2023-07-12T18:37:41+5:302023-07-12T18:37:55+5:30
फोंडा- एका बाजूने सरकार ग्रामीण भागातील शाळा वाचविण्यासाठी आटापिटा करत आहे. परंतु सरकारचे हे प्रयत्न हळूहळू अपुरे पडू लागले ...
फोंडा- एका बाजूने सरकार ग्रामीण भागातील शाळा वाचविण्यासाठी आटापिटा करत आहे. परंतु सरकारचे हे प्रयत्न हळूहळू अपुरे पडू लागले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून फोंडा तालुक्यातीलआडपई - आगापूर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी प्राथमिक विद्यालये इतिहास जमा झाल्या आहेत. पंचायत क्षेत्रातील सर्व विद्यालये इतिहास जमा होण्याची आडपई - आगापूर पंचायत राज्यात पहिली असू शकते.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्ष पाहणी केली असता पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी विद्यालय बंद आढळून आली. सदरच्या शाळा मधून शिक्षण घेतलेले अनेक लोक आज मोठ्या हुद्द्यावरून एक तर निवृत्त झाले आहेत किंवा काहीजण अजूनही मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. असे असतानाही त्यांनी शिकलेल्या शाळांची अशी परिस्थिती का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे जे इथे शिकले त्यांनी ह्या शाळांकडे पाठ फिरवताना आपल्या मुलांच्या बाबतीत शहरातील खाजगी शाळांना पसंती दिल्याने आजची ही परिस्थिती उद्भवली आहे.
विद्यालये बंद झाल्याने चिकली -आगापूर येथे पोर्तुगीजांनी बांधलेल्या इमारतीत सध्या पंचायत कार्यालय स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मात्र इतर काही विद्यालयाच्या इमारतीचा फक्त निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून वापर केला जात आहे. शाळा बंद असल्या तरी काही शाळावर नित्यानेमाने डागडूजी करण्यावर खर्च मात्र करण्यात येत आहे.
चिकली -आगापूर येथे येथील सरकारी शाळेला एक चांगला इतिहास असून पोर्तुगीजांनी बांधलेल्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल मानुयेल आंतोनीओ वस्सलो - ई - सिल्वा यांच्या हस्ते दि.१६ - १०- १९६१ साली करण्यात आले होते. परंतु दोन महिन्या नंतर गोवा पोर्तुगीज राजवटी पासून मुक्त झाल्यानंतर गोवा सरकारने सदर सुसज्ज इमारत सरकारी प्राथमिक विद्यालय म्हणून वापरण्यात सुरुवात केली होती. ऐतिहासिक महत्त्व असलेले निदान ही तरी शाळा सरकारने जतन करून ठेवायला पाहिजे किंवा येथे एखादे ऐतिहासिक संग्रहालय सुरू करायला हवे. परंतु गेल्या १०-१२ वर्षापासून सदर विद्यालय बंद असल्याने सुसज्ज इमारत शोभेची वस्तू बनली आहे. फक्त निवडणुकीचे मतदान केंद्र व सरस्वती पूजनासाठी सदर इमारतीचा वापर केला जात आहे.
त्याच बरोबर पंचायत क्षेत्रात असलेल्या अन्य ६ सरकारी प्राथमिक विद्यालये गेल्या काही वर्षापासून बंद आहेत. पंचायत क्षेत्रातील मुले फोंडा परिसरातील विविध हायस्कूल मध्ये सध्या शिक्षण घेत आहेत.
आडपई - आगापूर पंचायतीचे कार्यालय लहान आल्याने लोकांची गैरसोय होते. त्यामुळे पंचायत कार्यालय पोर्तुगीजांनी बांधलेल्या चिकली -आगापूर येथील बंद सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बंद असलेल्या इमारतीचा वापर पंचायत कार्यालयात म्हणून वापर केल्यास त्याचा निश्चित स्थानिक लोकांना लाभदायक ठरणार आहे. परंतु ऐतिहासिक वारश्याचे काय?
कावी कलेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर परिचित असलेले सागर मुळे यासंबधी अधिक माहिती देताना म्हणतात की पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी प्राथमिक विद्यालये इतिहास जमा झाली आहेत. फक्त एक दोन विद्यालयाच्या इमारती चांगल्या स्थितीत आहे. विद्यालये बंद होण्यास पंचायत क्षेत्रातील पालक जबाबदार आहेत. इंग्रजी शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलांना फोंडा शहरात पाठविण्याची प्रथा स्थानिकांनी सुरू केली आहे.
आपण याच मातीतील विद्यालयात शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे. परंतु आपल्या मुलांना गावातील विद्यालयात शिक्षण घेणे मिळत नसल्याने नाईलाजाने फोंडा शहरात पाठविण्याची वेळ आली आहे. सरकारी प्राथमिक विद्यालयात चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यात येते. परंतु विद्यालयात मुलांची पटसंख्या कमी झाल्याने कदाचित शेवटी सरकारला विद्यालये बंद करण्याची वेळ आली असावी.