पाटो येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, सुदैवाने जीवितहानी नाही
By समीर नाईक | Published: June 24, 2024 03:15 PM2024-06-24T15:15:56+5:302024-06-24T15:16:07+5:30
सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही, पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती.
पणजी: राजधानीत सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता. सकाळी ८ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर पाटो येथील डॉ. आंबेडकर उद्यान समोरील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची घटना सकाळी घडली. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही, पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती.
सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. झाड मुख्य रस्त्यावर कोसळल्याचे कळताच त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. दलाच्या जवानांनी माहिती मिळताच लगेचच घटनास्थळी दाखल होत, अथक प्रयत्नानंतर झाड कापून बाजूला काढण्यात आले, अर्ध्या तासानंतर वाहतुकीला रस्ता मोकळा करून देण्यात आला. यापूर्वी देखील येथे उद्यानाला लागून असलेली झाले भर रस्त्यावर पडलेली घटना घडल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या संरक्षण भिंतीला लागून अनेक मोठी झाडे आहेत. पावसात ही झाडे धोकादायक ठरत आहे. या झाडांची पाने रस्त्यावर पडून येथे निसरट होत असते. यातून अनेक दुचाकीस्वार घासरून पडले असून, अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. दरवर्षी याबाबत स्थानिक दुकानदार यांच्याकडून महानगरपालिकेकडे तक्रार येते, परंतु येथे काहीच उपाययोजना करण्यात येत नाही. हा रस्त्यावर जास्त टर्न असल्याने, हा रस्ता अपघात प्रवन क्षेत्र बनत चालला आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आताही स्थानिक दुकानदारांनी केली आहे.