डायलेसिस करुन घरी परत जात असताना गोव्यात अपघातात एक महिला गंभीर जखमी
By सूरज.नाईकपवार | Published: October 14, 2023 11:54 AM2023-10-14T11:54:56+5:302023-10-14T11:55:03+5:30
गोमेकॉत नेत असताना वाटेतच मृत्यूने गाठले
सूरज नाईकपवार
मडगाव: गोव्यातील काणकोण येथून डायलेसिस करुन मुलासमवेत दुचाकीवरुन घरी परत जात असताना बार्से येथे अपघात होउन एक महिला गंभीर जखमी झाली. नंतर तिला बांबोळी येथील गोमेकॉत उपचारासाठी घेउन जात असताना वाटेतच तिला मृत्यूने गाठले. शाबी शंभू वेळीप (४७) असे मयताचे नाव आहे. या अपघातात तीचा मुलगा आश्विन वेळीप (२४) हा किरकाेळ जखमी झाला.
काल शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान, अपघाताची वरील घटना घडली. मयत वयलोवाडो मोरपिर्ला येथील रहिवाशी आहे. डायलेसिस करण्यासाठी ती आपल्या मुलासमवेत काणकोण येथे गेली होती. तेथून परत येत असताना वाटेत दुचाकीचे पुढचे चाक नादुरुस्त झाले, त्यामुळे आश्विनचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकीसह तो व तिची आई खाली रस्त्यावर पडली. यात शाबी ही गंभीर जखमी झाली होती.
तिला सुरुवातीला बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, तेथून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले. नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोमेकॉत घेउन जात असताना, वाटेतच तिचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. स्वयंम अपघात म्हणून कुंकळ्ळी पाेलिसांनी या घटनेची पोलिस दफ्तरी नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.