तिच्या मुलाबरोबरचा 'तो' प्रवास तिचा अखेरचा ठरला
By आप्पा बुवा | Published: April 17, 2023 06:25 PM2023-04-17T18:25:20+5:302023-04-17T18:25:36+5:30
मुलासोबत बाजारात जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला.
फोंडा (गोवा) : शनिवारी दुपारी आपल्या मुलासोबत बाजारात जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा स्वयं अपघातातमृत्यू झाला असून, भरधाव वेगात असलेल्या स्कूटर चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने सदर अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बेतोडा येथील जंक्शन जवळ झालेल्या सदर अपघातात स्कूटर वरून रस्त्यावर पडलेल्या बालकिश केदार शेख (४२, केजीएन नगर, बेतोडा) या महिलेचा गोमेकोत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तानुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्दैवी महिला जीए- ०५- क्यू - ५१६१ क्रमांकाच्या स्कूटर वरून आपल्या मुलासह फोंडा येथे जात होती. सदर मार्गावर अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत भरधाव वेगात येणाऱ्या तिच्या मुलाला जंक्शन जवळील गतिरोधकाचा अंदाज आला नाही व गतिरोधक वर गाडा चढताच त्याचा तोल गेला व तो तो स्कूटरसह रस्त्यावर आपटला. स्कुटरच्या मागे बसलेली तिची आई सुध्दा यावेळेस रस्त्यावर पडली या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर जखमी महिलेला १०८ रुग्णवाहिकेतून अगोदर उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने अधिक उपचारासाठी सदर महिलेला गोमेकोत नेण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी जखमी महिलेचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
फोंडा ते बेतोडा तसेच हॉटेल आमीगोस, ते बेतोडा, बोरी ते बेतोडा ह्या तिन्ही रस्त्यावर भरधाव वाहने चालवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. खूप वेळा येथे दुचाकींच्या शर्यती सुद्धा लावल्या जातात. त्यामुळेच इथे अनेक अपघात घडलेले आहेत. तेव्हा पोलिसांनी या भागात निरंतरपणे गस्त ठेवावी अशी मागणी आता नागरिकाकडून होत आहे.