लहान मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला 5 दिवस तुरुंगवास, १ लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 06:39 PM2019-08-28T18:39:00+5:302019-08-28T18:39:06+5:30
अडीच वर्षाच्या अंगणवाडीतील मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला गोवा बाल न्यायालयाने दोषी ठरवत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मडगाव: अडीच वर्षाच्या अंगणवाडीतील मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला गोवा बाल न्यायालयाने दोषी ठरवत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय पाच दिवस तुरुंगाची शिक्षा देण्यात आली आहे. 2015 मध्ये झालेल्या या प्रकरणाचे पूर्ण गोव्यात पडसाद उमटले होते. या निवाडय़ातून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत आणि गोव्यातील मुले सुरक्षीत रहातील हा संदेश सर्व समाजाकडे पोहोचू शकेल असा अभिप्राय बाल न्यायालयाच्या अध्यक्ष वंदना तेंडुलकर यांनी आपल्या आदेशात व्यक्त केला.
एप्रिल 2015 मध्ये सातेरीवाडी-कामुर्ली येथे ही घटना घडली. या वाडय़ावरील अंगणवाडीत येणा:या अडीच वर्षाच्या मुलाला सदर सेविकेने गरम चमच्याने चटका दिल्याने त्याच्या गालावर जखम झाली होती. या प्रकरणानंतर सेविकेला अटक करण्यात आली होती. त्या दिवशी त्या केंद्रात एकूण पाच मुले होती. आपल्या मुलाला अंगणवाडी केंद्रात ठेऊन मुलाची आई कामाला गेल्याने ते मुल जोरजोरात रडत होते. त्यामुळेच या सेविकेने रागाने त्याला गरम चमच्याने डागले. अंगणवाडी केंद्राच्या शिक्षिकेने या सेविकेच्या विरोधात न्यायालयात दिलेल्या साक्षीवर विसंबून न्यायालयाने हा आदेश दिला.
तसेच हा प्रकार भयंकर असून त्यासाठी या सेविकेला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी मागणी सरकारी वकील एफ. नोरोन्हा यांनी न्यायालयासमोर केली. मात्र संशयिताच्यावतीने बाजू मांडणारे वकील दामोदर धोंड यांनी सदर सेविका अत्यंत गरीब असून तिला कामावरुन काढून टाकल्याने तिच्याकडे रोजगाराचा पर्याय उपलब्ध नाही. तिच्या नव:यालाही मस्कतवरील नोकरीतून काढून टाकले असून तिला दोन मुलांचा प्रतिपाळ करावा लागतो. त्यांच्याकडे बघण्यासाठी आणखी कुणी नसल्याने न्यायालयाने शिक्षा देताना दया दाखवावी अशी मागणी केली. सदर महिलेचे वय आणि घरची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने केवळ तिला पाच दिवसांचीच शिक्षा दिली. दंडाची रक्कम राष्ट्रीय बाल निधीत किंवा राज्य बाल निधीत जमा करावी असे या आदेशात म्हटले आहे.