'आप'चे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; न्यायालयीन चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 12:37 PM2024-11-14T12:37:28+5:302024-11-14T12:38:42+5:30

बाणावली येथेसुद्धा अशाच प्रकारे काहींकडे नोकरीसाठी पैशांची मागणी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

aap delegation meets governor demand for judicial inquiry about job scam case in goa | 'आप'चे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; न्यायालयीन चौकशीची मागणी

'आप'चे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; न्यायालयीन चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना याविषयी त्वरित बोलावून घ्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे बुधवारी केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय न्यायालयीन समिती स्थापन करावी, तपास पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया निलंबित करावी, कर्मचारी निवड आयोगामार्फतच नोकरभरती करावी, अशी मागणीही 'आप'ने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, कुज सिल्वा, वाल्मिकी नाईक व अन्य यांचा राज्यपालांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात समावेश होता.

अमित पालेकर म्हणाले की, 'सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी आता मंत्री, आमदार, भाजप पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत. याप्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली असली तरी त्याचा पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचा दावा केला जात आहे. एकूणच पोलिसांना मुक्तपणे तपास करू दिला जात आहे. सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळू नये. या सर्व प्रकरणाची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. हवे असल्यास आम्ही साक्षीदार म्हणून तपासात सहकार्य करू. पोलिस खात्यातील उपनिरीक्षक पदांची झालेली भरतीही एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कुडतरीतील प्रकरणाचा पर्दाफाश करू

आमदार व्हिएगस म्हणाले की, 'सरकारी नोकरी देण्यासाठी पैशांची मागणी होणे हे गंभीर आहे. आता त्यात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही नावे समोर येत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी याप्रश्नी त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज असून, मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. राज्यपालांनी याप्रश्नी दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे

बाणावली येथेसुद्धा अशाच प्रकारे काहींकडे नोकरीसाठी पैशांची मागणी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कुडतरी तेथील एका भाजप पदाधिकाऱ्याला दोन उमेदवारांनी पैसे दिल्याचे म्हटले जात आहे' असे ते म्हणाले. याचा लवकरच पर्दाफाश करू असा इशाराही त्यांनी दिला.

आमदाराने नोकरीसाठी सात लाख मागितले?

सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवरही आरोप होऊ लागले आहेत. सरकारी खात्यात एका उच्च पदावरील नोकरी देण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी कार्यकर्त्याकडे केल्याप्रकरणी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्याविरोधात आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी गावकर यांची कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
 

Web Title: aap delegation meets governor demand for judicial inquiry about job scam case in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.