‘आप’कडून मुख्यमंत्र्यांना सात दिवसांची मुदत
By admin | Published: June 15, 2016 01:41 AM2016-06-15T01:41:51+5:302016-06-15T01:43:33+5:30
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू घन:श्याम मालवणकर यांना काही महिन्यांपूर्वी लाचप्रकरणी पोलिसांच्या
पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू घन:श्याम मालवणकर यांना काही महिन्यांपूर्वी लाचप्रकरणी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना त्या वेळी सरकारने सेवेतून निलंबित केले होते. तथापि, आता पुन्हा घन:श्याम मालवणकर यांना गोवा औैद्योगिक विकास महामंडळात सेवेत रुजू करून घेण्यात आले असल्याने आम्ही याविरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते रूपेश शिंक्रे, प्रदीप घाडी आमोणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथे सांगितले.
मालवणकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश येत्या सात दिवसांत मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा. अन्यथा आल्तिनो येथील त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेऊ, असे आपच्या नेत्यांनी जाहीर केले.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंक्रे यांनी सांगितले, की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांचा साडू मालवणकर यांच्या लाचप्रकरणी चौकशी करणारे पोलिस निरीक्षक रापोझ यांची अगोदर सरकारने बदली केली. मग भ्रष्टाचारविरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांचीही मुद्दाम बदली केली. त्यानंतर जे एस.पी. त्या जागी आले, त्यांना मालवणकर प्रकरणी फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते.
शिंक्रे म्हणाले, की झिरो टॉलरन्स टू करप्शनच्या गोष्टी सरकार बोलते; पण प्रत्यक्षात स्वत:च्या नातेवाईकांबाबत कसे वागते ते कळून आले आहे.
मालवणकर यांची चौकशी न करताच त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले आहे.आम्ही येत्या सात दिवसांत सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये याबाबत जागृती करू. आम्ही हा विषय घरोघर पोहोचवू आणि सात दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सुधारणा केली नाही तर मोर्चा काढू. (खास प्रतिनिधी)