आपचे नेते अमित पालेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार
By आप्पा बुवा | Updated: August 26, 2024 19:43 IST2024-08-26T19:42:49+5:302024-08-26T19:43:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा बाणस्तरी अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आपचे नेते अमित पालेकर यांच्या अडचणीत वाढ झाली ...

आपचे नेते अमित पालेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार
लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा बाणस्तरी अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आपचे नेते अमित पालेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुन्हा अन्वेषण विभागाचां अर्ज उचलून धरला. सविस्तर वृत्तानुसार अख्या गोव्यात खळबळ माजवलेल्या बाणस्तरी अपघात प्रकरणात एक आरोपी म्हणून आप चे नेते अमित पालेकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागच्या वर्षी अटकेच्या भीतीने त्यानी जामीन मंजूर करून घेतला होता. सदर जामीन देताना त्यांनी विदेश वारी करू नये असा नियम घालण्यात आला होता. सदर नियम त्यांनी तोडल्याचा ठपका गुन्हा अन्वेषण विभागाने ठेवला होता. गुन्हा अन्वेषण विभागाच्या अर्जानुसार त्यांनी परवानगी फ्रान्स करता घेतली होती .फ्रान्स ला भेट दिल्यानंतर त्याने आणखी चार देशांना भेटी दिल्या होता व अटीचा भंग केला होता.
शुक्रवारी त्या संदर्भात जिल्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला होता. सदरची सुनावणी सोमवारी ठेवली होती .सोमवारी सरकारी वकील राजाराम देसाई यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या अर्जावर पुन्हा एकदा आपले मत मांडले. न्यायाधीशानी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालेकर यांचा जामीन अर्ज रद्द करावा ही मागणी उचलून धरली. जामीन अर्ज रद्द झाल्याने अमित पालेकर यांना आता कधीही अटक होऊ शकते. अशी शक्यता आहे.