आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या सासष्टीत बैठका; लोकसभा निवडणुकीची तयारी
By सूरज.नाईकपवार | Published: January 19, 2024 06:25 PM2024-01-19T18:25:54+5:302024-01-19T18:26:35+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सासष्टीतील बाणावली व वेळळी मतदारसंघात जाउन लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण केले.
मडगाव: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सासष्टीतील बाणावली व वेळळी मतदारसंघात जाउन लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण केले, इंडिया युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दयावा असे आवाहन केले. त्याचबरोबर २०२७ साली गोव्यात विधानसभा निवडणुकीत आपला बहुमत मिळून सरकार सत्तेवर आले तर या राज्याचा कायापालट करु असेही ते म्हणाले. बाणावली येथे आज शुक्रवारीआयोजित सभेत बोलताना केजरीवाल यांनी आम्ही पैसे कमविण्यासाठी राजकारणात आलेलो नाहीत.
चांगले करियर सोडून आम्ही राजकारणात आलो याचे कारण म्हणजे राजकारण्यांनी हा देश लुटला. ही घाण आम्हाला साफ करायची आहे. दिल्लीत आम्ही तीनदा विजयी झालो. मागच्या खेपेला पंजाबातही विजयी झालो असे सांगितले.दिल्ली व पंजाबमध्ये आम्ही २४ तास वीज पुरवठा सुरु केला. तोही विनाबील. मोहल्ला क्लिनिक सुरु केले. सरकारकडे पैसा आहे मात्र त्यांच्याकडे विचाराची कमतरता आहे असे ते म्हणाले.
बाणावली येथे आयोजित कार्यक्रमात केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतस सिंग मान, राज्यसभा खासदार संदीप पाठक, आपचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रु्झ सिल्वा , बाणावली जिल्हा पंचायतीचे सदस्य हेन्झल फर्नांडीस व अन्य उपस्थित होते.
केजरिवाल व अन्य मान्यवरांनी यावेळी बाणावलीत मोहल्ला क्लिनीकचीही पहाणी केली. सरकार सत्तेवर नसतानाही आमदार व्हिएगस यांनी हे जे काम केले आहे ते खरोखरच दखलपात्र आहे असे ते म्हणाले.
पंजाबाचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी पंजाबात आपने केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. ईव्हीएम मशिन संबधी बोलताना ते म्हणाले की सर्व जण या यंत्रणेला दोष देताना भाजप मात्र त्याचे समर्थन करतो. काहीतरी खास बाब असेल असे ते उदगारले. भाजप धर्माचे राजकारण करतो आम्ही सौर्दयाची भाषा बोलून , विकासाची भाषा बोलत आहेत , आप हा सर्वात जास्त वेगाने प्रगती करणारा पक्ष असल्याचे ते म्हणाले.
आमदार वेन्झी व्हिएगस यांचेही यावेळी भाषण झाले. नंतर वेळ्ळी मतदारसंघातील आंबेली येथे जाउन केजरीवाल व अन्य मान्यवरांनी डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.