आरती गोंड हिच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाखांची मदत जाहीर!
By समीर नाईक | Published: July 22, 2024 05:52 PM2024-07-22T17:52:49+5:302024-07-22T17:52:55+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील याबाबत पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली.
पणजी: पणजीत रविवारी चर्च स्क्वेअरकडे झाड पडून मृत्यमुखी पडलेल्या रामनगर, बेती येथील १९ वर्षीय आरती गोंड हिच्या कुटुंबीयांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री मदत निधीतून ४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील याबाबत पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली.
रविवारी संततधार पाऊस सुरू असताना पणजीतील प्रसिद्ध चर्च स्क्वेअर जवळील पालिकेच्या उद्यानासमोर सकाळी सुमारे १०.३० च्या सुमारास मोठे झाड कोसळून आरती गोंड ही युवती गंभीर जखमी झाली होती. तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यानंतर दाखल करण्यात आले होते, पण रात्री उशिरा उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. १९ वर्षीय युवती झाड कोसळून पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याचीच नोंद घेत मुख्यमंत्र्यांनी सदर आर्थिक मदत जाहीर केले.
आरती गोंड ही रविवारी कामावर जात असताना ही घटना घडली. झाड अचानक कोसळल्याने तिला तेथून पाळही काढता आला नाही. झाड थेट पडल्याने सदर युवती मोठ्या फांदीखाली अडकून पडली होती. उपस्थित नागरिकांनी अग्निशामक दलाला कॉल करून याबाबत माहिती दिली होती, त्यानुसार दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचत, झाड व फांद्या कापून या युवतीला बाहेर काढले. व नंतर रुग्णवाहिकेची सहाय्याने तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.
गेल्या काही दिवसात सुमारे तीन ते चार मोठी झाडे या चर्च स्क्वेअर भागात मुळासहित उपळून पडल्या आहेत. यातून सुदैवाने जीवितहानी झाली न्हवती, पण वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे