दोनापावला येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
By पूजा प्रभूगावकर | Updated: May 13, 2024 16:55 IST2024-05-13T16:54:57+5:302024-05-13T16:55:23+5:30
अपहरणाची ही घटना रविवारी १२ रोजी रात्री घडली आहे. सदर पॉश रहिवासी कॉलनीच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

दोनापावला येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
पणजी: दोनापावला - पणजी येथील एका पॉश रहिवासी कॉलनीमधून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पणजी पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.
अपहरणाची ही घटना रविवारी १२ रोजी रात्री घडली आहे. सदर पॉश रहिवासी कॉलनीच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. अपहरण झालेली अल्पवयीन ही त्यापैकीच एका सुरक्षारक्षकाचीच मुलगी आहे. आपल्या कामाच्या ठिकाणाहून या मुलीचे अपहरण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा सुरक्षारक्षक मुळ उत्तरप्रदेश येथील असून तो गोव्यात काही वर्षांपासून काम करीत आहेत.
या अपहरण प्रकरणी पणजी पोलिसांनी गोवा बाल कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून ते पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जावून काही जणांच्या जबानी नोंद केल्या आहेत. दोनापावला हा परिसर बराच विकसित असून तेथे अनेक रहिवासी कॉलनी आहेत. अशातच तेथील एका पॉश रहिवासी कॉलनीमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याने त्यांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.