खांडेपार येथील नियोजित बंधारा रद्द करा, कलम १४४ हटवा; गाकुवेकडून राज्यपालांना निवेदन
By पूजा प्रभूगावकर | Published: October 3, 2023 05:10 PM2023-10-03T17:10:05+5:302023-10-03T17:12:31+5:30
गाकुवेधचे सरचिटणीस रुपेश वेळीप म्हणाले, की खांडेपार येथील ज्या जागेत हा बंधारा येणारआहे, तो आदिवासी परिसर आहे.
पणजी - खांडेपार येथील नियोजित बंधाऱ्याचे काम त्वरित रद्द करा, त्या परिसरात लावलेले कलम १४४ हटवा अशी मागणी गाकुवेधने राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांची राजभवन येथे जाऊन भेट घेऊन केली. यावेळी सदर बंधारा प्रश्नी खांडेपार येथील लोकांच्या मागणीचा विचार करावा असे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले जाईल असे आश्वासन राज्यपालांनी गाकुवेधच्या शिष्टमंडळाला दिले.
गाकुवेधचे सरचिटणीस रुपेश वेळीप म्हणाले, की खांडेपार येथील ज्या जागेत हा बंधारा येणारआहे, तो आदिवासी परिसर आहे. त्यांची या ठिकाणी शेती, कुळाघरे आहे. या भागात १९८२ साली पूर आला होता. त्यामुळे जर तेथे बंधारा झाला तर पुन्हा पूर येऊन घरे, शेती वाहून जाण्याची भीती आहे. कदाचित या प्रकल्पात कुणाचा तरी छुपा हेतू असल्यानेच सरकार या बंधाराला प्रकल्पाला पाठिंबा देत आहे. नक्की प्रकल्प काय हे सुध्दा तेथील लोकांना ठाऊक नसतानाच प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. जर बंधारा झाला तर तेथे पूर येईल का ? लोकांचे कसे हाल होतील, पर्यावरणावर कुठला परिणाम होईल याचा अभ्यास सरकारने केलेला नाही. या प्रकल्पासाठी सीआरझेड नियमांचेही उल्लंघन केल्याचा आराेप त्यांनी केला.