राज्यात चार वर्षात ५६३ ड्रग्स तस्करीचे गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 04:31 PM2024-02-10T16:31:44+5:302024-02-10T16:32:49+5:30
राज्यात ड्रग्ज तस्करीच्या गुन्हेगारीत झपाट्याने वाढ हाेत आहे.
नारायण गावस,पणजी: राज्यात ड्रग्ज तस्करीच्या गुन्हेगारीत झपाट्याने वाढ हाेत आहे. २०२० ते २०२३ या चार वर्षात एकूण ५६३ ड्रग्ज तस्करीचे गुन्हे पाेलीस खात्यात नाेंद झाली आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात लेखी उत्तरात दिली आहे. आमदार दिगंबर कामत यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.
गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने राज्यात देश विदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे या ड्रग्ज गुन्हेगारीत फक़्त राज्यातील नाही तर विदेशी तसेच देशी नागरिकांचा सहभाग आहे. या ५६३ ड्रग्ज गुन्हेगारीत १०८ गुन्हेगार हे विदेशी नागरिक आहेत. तर ३७० गुन्हेगार हे राज्याबाहेरील नागरिक आहेत. तर १८६ हे स्थानिक नागरिकांची ड्रग्ज गुन्हेगारीत नाेंद झाली आहे. यात युवकांची संख्या जास्त आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.
राज्यातील बहुतांश ड्रग्ज तस्करीचे गुन्हे हे किनारी भागात घडत आहेत. ज्या भागात पर्यटकांची जास्त संख्या आहे अशा ठिकाणी हे ड्रग्ज तस्करीचे गुन्हे घडले आहेत. विदेशी नागरिकांमध्ये यात रशियन, आफ्रिकन नागरिकांचा जास्त सहभाग आहे. तसेच अन्य काही देशी नागरिकांची सहभाग आहे. या ड्रग्ज जाळ्यात युवकांना ओढले जात आहे. ड्रग्स तस्करीच्या गुन्हे आता राज्याच्या ग्रामिण भागापर्यंत पाेहचले आहेत.
चार वर्षातील ड्रग्ज गुन्हेगारीची संख्या :
वर्ष : गुन्हे : विदेशी गुन्हेगार : देशी गुन्हेगार : स्थानिक गुन्हेगार
२०२० : १४८ : ३६ : ८२ : ५४
२०२१: १२१ : २२: ८७ : २९
२०२२: १५४: २९ : १०३ : ५६
२०२३: १४०: २१: ९८: ४७