पर्रिकरांअभावी भाजपाचा ख्रिस्ती धर्मियांमधील जनाधार ढासळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 09:39 PM2019-05-25T21:39:05+5:302019-05-25T21:39:24+5:30
ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली.
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हयात असताना गोव्यातील भाजपला उत्तर व दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांमध्ये जो थोडा तरी जनाधार प्राप्त झाला होता, तो जनाधार पर्रिकरांच्या निधनानंतर ढासळला आहे हे ताज्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात 2014 साली ख्रिस्ती मतदारांनी भाजपला थोडी तरी मते दिली होती. त्यामुळेच तिथे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा पराभव झाला होता. यावेळी सासष्टीत प्रचंड मते काँग्रेसला मिळाली. वेळ्ळीसह सासष्टीतील आठपैकी एकूण तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दहा हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. सासष्टी बाहेर हिंदू मतदारांनी भाजपच्या आघाडीचे प्रमाण कमी केले. मुरगाव, फोंडा, सांगे तालुक्यात भाजपच्या आघाडीचे प्रमाण घटले. पर्रिकर हयात असते व ते सक्रिय असते तर असे घडले नसते अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात सुरू झाली आहे.
ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली. कुठ्ठाळीत तर काँग्रेसला आघाडी मिळाली. सासष्टीतील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपचा पाया कमकुवत झाला आहे. सासष्टीबाहेरही भाजपची हक्काची मते भाजपला मिळाली नाहीत. र्पीकर यांच्या चेह:यामुळे व नेतृत्वामुळे भाजपला मते मिळत होती. ख्रिस्ती मतदारही थोडी तरी मते देत होते, तिही यावेळी नाहीशी झाली. याविषयी पक्षात चिंतन होण्याची गरज काही घटक व्यक्त करत आहेत. भाजप जिथे ख्रिस्ती उमेदवारांना तिकीट देतो, तिथे विधानसभा निवडणुकीत ख्रिस्ती उमेदवार निवडून येतात पण हे उमेदवार स्वत:चा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये भाजपसाठी ख्रिस्ती मते आणू शकत नाहीत हे सिद्ध झाले आहे. माविन गुदिन्हो यांचाही भाजपला फार लाभ झाला नाही. दाबोळीत भाजपला आघाडी मिळाली तरी, मतांचे प्रमाण कमी झाले आहे.
पणजी मतदारसंघात सहा हजार ख्रिस्ती मतदार आहेत. त्यापैकी चार हजार मतदान करण्यासाठी येतात. विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीतील ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपने माविन व अँलिना साल्ढाणा यांचा वापर केला. माविन व अँलिना पणजीत थोडय़ा फिरल्या पण मते भाजपला मिळाली नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी पणजीत भाजपला अडीच हजारांची आघाडी मिळाली ती हिंदू मतांमुळे. मात्र पोटनिवडणुकीत पणजीत काँग्रेसला हिंदू मते मिळालीच, शिवाय हिंदू बहुजन समाजाचीही खूप मते प्राप्त झाली. यामागिल नेमके कारण काय याचा शोध सध्या पक्षाची कोअर टीम घेत आहे. भाजपने पणजीत आपल्या पक्षाच्या अन्य ख्रिस्तीधर्मीय मतदारांना जास्त कामच दिले नव्हते.