...तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारेन- श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:57 AM2018-12-09T03:57:54+5:302018-12-09T03:58:30+5:30
पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.
पुणे : मी पक्षाची शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने मला न मागता चार वेळा खासदारकी, मंत्रीपद दिले आहे. पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य सेवांचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाईक यांचे नाव चर्चेत आहे, त्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पक्ष सांगेल त्या आदेशाचे पालन केले जाईल, असे सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या दंतचिकित्सा सेवा व आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. दंतचिकित्सा सेवा लगेच सुरू केल्या. तर आपत्कालीन वैद्यकीय सेवा १ जानेवारी २०१९ पासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांसाठी उपलब्ध असतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, महेश आबाळे, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. जयंत देवपुजारी, वैद्य योगेश बेंडाळे, आरोग्य केंद्राचे समन्वयक डॉ. शशिकांत दूधगावकर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना तातडीची गरज भासल्यास वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, त्याचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.