गोव्यातील फोंड्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; उसगाव येथे दुचाकीस्वार ठार
By आप्पा बुवा | Published: June 12, 2024 03:46 PM2024-06-12T15:46:20+5:302024-06-12T15:46:42+5:30
अपघाताची श्रृंखला सुरूच
आप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: येथे अपघाताची श्रृंखला सुरूच असून मंगळवारी रात्री उसगाव येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचे निधन झाले आहे.
सविस्तर वृत्तानुसार टिप्पाना रामू वर्षेकर ( वय 49, राहणार तिस्क उसगाव, मूळ अनमोड कर्नाटक हा आपल्या दुचाकीवरून उसगाव येथून तिस्क कडे जाण्यासाठी निघाला होता. उजगाव गांजे ग्रामपंचायत समोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात रात्री साडेआठच्या दरम्यान त्याची दुचाकी पडली. सदर अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. जखमी अवस्थेत त्याला अगोदर पिळये येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
नंतर अधिक उपचारासाठी त्याला रात्री गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार चालू असताना बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. फोंडा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्यमुखी झालेला वर्षेकर हा एमआरएफ कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. तिस्क येथे तो भाडेपट्टीवर राहत होता. त्याच्या पक्षात पत्नी व चार लहान मुले असा परिवार आहे.