ड्युटीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकाचा आकस्मिक मृत्यू
By पंकज शेट्ये | Published: March 20, 2024 05:00 PM2024-03-20T17:00:29+5:302024-03-20T17:00:55+5:30
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ती घटना घडली.
पंकज शेट्ये,वास्को : दाबोळी विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक नाथू राम (वय ५५) यांचे ड्युटीवर असताना आकस्मिक निधन झाले. मंगळवारी (दि.१९) रात्री नाथू राम ड्युटीवर असताना शौचालयात गेले असता तेथेच ते खाली कोसळून नंतर त्यांचा मृत्यू झाला.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. नाथू राम रात्री ९ वाजता ड्युटीवर आला. १०.३० च्या सुमारास तो दाबोळी विमानतळावरील शौचालयात गेला असता अकस्मात तो खाली कोसळला. सहाय्यक उपनिरीक्षक नाथू राम बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्याचे ड्युटीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवान - अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले. नाथू राम यांना इस्पितळात नेल्यानंतर तेथे आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नाथू राम यांची बदली होऊन सुमारे १ वर्ष ९ महीन्यापूर्वी ते दाबोळी विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताफ्यात रुजू झाले होते. ते मूळ भिण्ड, मध्यप्रदेश येथील रहीवाशी असून दाबोळी विमानतळावर सेवेत रुजू झाल्यानंतर ते शांतीनगर, वास्को येथे रहायचे. नाथू राम यांच्या पच्छात त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सूत्रांकडून मिळाली.
चिखली उपजिल्हा इस्पितळात नाथू राम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर दाबोळी विमानतळ पोलीसांनी मंगळवारी रात्री त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. नंतर त्यांचा मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला असून बुधवारी (दि.२०) मृतदेहावर शवचिकीत्सा केल्याची माहीती पोलीसांनी दिली. दाबोळी विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.