तेलाऐवजी पणतीत चुकून ओतले पेट्रोल; महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 05:14 PM2023-11-15T17:14:36+5:302023-11-15T17:15:41+5:30
पणत्यांमध्ये चुकून तेलाऐवजी पेट्रोल घातल्याने आगीचा भडका उडाल्याची धक्कादायक घटना गोव्यातील रामतळे-हळदोणा येथे घडली.
म्हापसा : रामतळे-हळदोणा येथे सोमवारी रात्री साईनगरात साईबाबांच्या पालखी मिरवणुकीवेळी घरापुढे पणत्या पेटवून स्वागताची तयारी करणारी महिला भाजून जखमी झाली. दीक्षिता विजेंद्र नाईक (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. पणत्यांमध्ये चुकून तेलाऐवजी पेट्रोल घातल्याने आगीचा भडका उडाला आणि त्यात दीक्षिता या भाजल्या. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामतळे येथे साईबाबांची पालखी आपल्या घराजवळ पोहोचतास दारातच दीक्षिता यांनी पणत्या पेटविण्यास सुरुवात केली. पणतीत तेल घालण्यासाठी तिने बाटली घेतली. मात्र, त्यामध्ये नवऱ्याने बाईकमध्ये भरण्यासाठी आणलेले पेट्रोल होते. हे पेट्रोल पणत्यांमध्ये घालताना पणतीने पेट घेतला. त्यापाठोपाठ बाटलीही पेटली. बाटली खाली पडल्याने तेथेच असलेल्या तीन स्कूटर पेटतील, अशा भीतीने दीक्षिता यांनी पेटलेली बाटली पायाने पुढे ढकलली. यांदरम्यान, आग जास्त भडकली.
आग लागल्याचे लक्षात येताच त्या रस्त्यावर धावल्या. पालखीवेळी उपस्थित लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. दीक्षिता यांना हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले. दीक्षिता या जवळपास ७० टक्के भाजून जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग लागली तेव्हा त्यांचे पती घरात नव्हते. मुलगाही सुट्टीनिमित्त मामाकडे गेला असताना हा प्रकार घडला.