दोन महिन्यांत अपघात नियंत्रणात आणू: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 03:04 PM2023-12-15T15:04:34+5:302023-12-15T15:08:23+5:30
अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक आणि बांधकाम ही दोन्ही खाती संयुक्तपणे काम करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अपघात नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक कृती दलाने काही महत्त्वाच्या शिफारसी बांधकाम खात्याला केल्या आहेत. पुढील दोन महिन्यात त्याची अंमलबजावणी करून रस्ते अपघात रोखले जातील. तूर्त काही ठिकाणी गतिरोधकांसह बॅरिकेड्स वगैरे घालण्याचे काम चालू केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक आणि बांधकाम ही दोन्ही खाती संयुक्तपणे काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी कामाचा आढावा घेतला आहे. येणाऱ्या काळात नाताळ व नववर्षाची धूम गोव्यात असणार आहे. त्यामुळे रस्त्यावर स्थानिकांची तसेच पर्यटकांची वाहने वाढतील. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी सरकार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
अपघातप्रवण क्षेत्रात ठिकठिकाणी सूचना देणारे फलक लावले जातील. तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स टाकले जातील. गरज आहे त्या ठिकाणी सिग्नलही बसवले जात आहेत. सर्व कामांचे टेंडर झालेले आहे. वाहतूक पोलिस विभागात नवीन अधीक्षकांनी काम सुरू केले आहे. नाताळ, नववर्षात वाहतूक हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.