गोव्यात उद्यापासून निवासाची हॉटेल्स खुली; व्यावसायिकांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:46 PM2020-07-01T21:46:02+5:302020-07-01T21:46:58+5:30
सरकारने परवानगी दिल्याने हॉटेल व्यावसायिकांना आशावादी आहेत.
पणजी : गोव्यात उद्या गुरुवार २ जुलैपासून निवासाची हॉटेले खुली होतील. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून तारांकित व अतारांकित मिळून २६0 हॉटेले उघडतील त्यामुळे देशी पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. सरकारने परवानगी दिल्याने हॉटेल व्यावसायिकांना आशावादी आहेत.
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, ‘पर्यटक नसले म्हणून काय झाले? हॉटेले केवळ पर्यटकांच्याच जीवावर चालत नाहीत तर कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अन्य उपक्रमांसाठीही हॉटेले लागतात. जीपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी येणारे उमेदवार, त्यांचे पालक हेदेखिल हॉटेलांमध्ये उतरतात. आयुर्विमा महामंडळाचे अनेक कार्यक्रम होत असतात. उद्योगांचे प्रतिनिधी, तंत्रज्ञही येत असतात.
बड्या कंपन्यांचे सीईओ, एमडी यांच्याकडून हॉटेलांसाठी विचारणा
टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘हॉटेले कधी ना कधी तरी सुरु करावी लागणारच होती. सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल पर्यटन व्यावसायिक आभारी आहेत. ‘कोविड’च्या या संकटात घरी बसून काम करणारे बड्या कंपन्यांचे सीईओ, एमडी यांच्याकडून पंधरा दिवस, महिनाभराच्या वास्तव्यासाठी गोव्यातील हॉटेलांकडे विचारणा होत असे. हे अधिकारी आता गोव्यात येऊन हॉटेलांमध्ये बसून काम करु शकतील.
लॉकडाऊनमुळे बाहेर पडता आले नव्हते त्यांना हवापालट करण्याची संधी गोव्यातील हॉटेले सुरु झाल्याने मिळेल. शहा म्हणाले की, ‘उद्या ३ तारीखपासून मुंबई- गोवा विमानसेवाही सुरु होत आहे. आठवड्यातून तीन दिवस इंडिगोची विमाने मुंबईहून येणार आहेत. दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद येथून याआधीच विमानसेवा सुरु झालेली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून गोव्यात पर्यटनासाठी किंवा विश्रांतीसाठी येऊ इच्छिणारे लोक येथील निवासाची हॉटेले कधी सुरु होणार याची चौकशी करीत होते. त्यांचा गोवा भेटीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
वेट अॅण्ड वॉच भूमिका!
शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार तारांकित व इतर मिळून राज्यात ३८५0 हॉटेले आहेत. पैकी केवळ २६0 हॉटेलमालकांनी हॉटेले खुली करण्यासाठी अर्ज केलेले आहेत. इतरांची ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका आहे. सध्या ऑफ सिझन असल्याने ऑक्टोबरनंतरच हॉटेले सुरु करण्याचा निर्णयही काहीजणांनी घेतला आहे.
शहा म्हणाले की, ‘ कर्नाटकात अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. लोक बंगळुरुहून ऊटी, म्हैसूर, कूर्गला जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या बाबतीत तेथील कवाडे खुली झालेली आहेत. गोव्यातही लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागलेले काही लोक बदल म्हणून एक दोन दिवसाच्या वास्तव्यासाठी हॉटेलांमध्ये येऊ शकतात. सध्या ऑफ सिझनमध्ये हॉटेलचे दरही कमी असतील.’