पेडणेत बटालियनसाठी निवास व्यवस्था; आराखडा मंजूर
By admin | Published: December 28, 2016 01:14 AM2016-12-28T01:14:39+5:302016-12-28T01:18:48+5:30
पणजी : पेडणे तालुक्याचा प्रादेशिक आराखडा सरकारच्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी येथे झालेल्या बैठकीवेळी मंजूर केला.
पणजी : पेडणे तालुक्याचा प्रादेशिक आराखडा सरकारच्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी येथे झालेल्या बैठकीवेळी मंजूर केला. पेडणेत आयआरबी, सीएसआयएफ अशा कंपन्यांच्या बटालियनसाठी निवास व्यवस्था करण्याची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची (एसएलव्ही) बैठक पार पडली. यापूर्वी काणकोण व सत्तरी तालुक्याचे आराखडे या समितीने निश्चित करून जाहीर केले आहेत. मंगळवारी पेडणेच्या आराखड्यास अंतिम रूप देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले.
आराखड्यासाठी एकूण एक हजार सूचना व आक्षेपांचे अर्ज आले होते. त्यापैकी साठ अर्ज स्वीकारण्यात आले व त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात आल्याचे डिसोझा यांनी सांगितले. मोपा विमानतळाच्या केंद्रबिंदूपासून पाच किलोमीटर अंतरावरील सगळी जागा ही नियोजित मोपा विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) कक्षेत येणार आहे. पेडणे तालुक्यात चार ते पाच इको-हब तयार केले जातील. तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीही आराखड्यावेळी विचारात घेण्यात आली, असे डिसोझा यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)