कार्निव्हलप्रमाणे गोव्यातील पारंपारिक नाताळही इतिहासजमा, आता केवळ वीजेच्या रोषणाईवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 05:27 PM2017-12-26T17:27:24+5:302017-12-26T17:27:39+5:30

गोव्यात एक जमाना असा होता की डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच सर्वांना नाताळाची चाहूल लागलेली असायची. नाताळाची तयारी अगदी महिन्याभरापूर्वीच सुरु होत असे. घरासमोर क्रिबचा देखावा यावेळी कसा करायचा, ख्रिसमसची सजावट कशी करायची यापासून स्टार बनविण्याची तयारी ख्रिसमसला पंधरा दिवस असतानाच सुरु व्हायची.

According to Carnival, the traditional Christmas in Goa is also a history, now only solution to the energy harvesting | कार्निव्हलप्रमाणे गोव्यातील पारंपारिक नाताळही इतिहासजमा, आता केवळ वीजेच्या रोषणाईवर समाधान

कार्निव्हलप्रमाणे गोव्यातील पारंपारिक नाताळही इतिहासजमा, आता केवळ वीजेच्या रोषणाईवर समाधान

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यात एक जमाना असा होता की डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच सर्वांना नाताळाची चाहूल लागलेली असायची. नाताळाची तयारी अगदी महिन्याभरापूर्वीच सुरु होत असे. घरासमोर क्रिबचा देखावा यावेळी कसा करायचा, ख्रिसमसची सजावट कशी करायची यापासून स्टार बनविण्याची तयारी ख्रिसमसला पंधरा दिवस असतानाच सुरु व्हायची. महिलांमध्ये दोदोल, बिबिंक, दोश, पेराद, नेव-या आदी पारंपारिक मिठाईचे पदार्थ करण्याची तयारी चालू असायची. हे पदार्थ ज्या भांड्यात तयार केले जायचे, त्या भांड्यांना कल्हई काढण्यासाठी ‘कलयकार’ प्रत्येक गावात यायचा. त्याच्याकडून कल्हई काढून घेऊन भांडी चकचकीत करुन घेतली जायची.
मात्र, आता कार्निव्हलप्रमाणोच गोव्यातील ख्रिसमसची व्याख्याही बदलली आहे. गोव्यातील ख्रिसमसची पारंपारिकता नष्ट होऊन त्याजागी चायनामेड दिव्यांच्या रोषणाईने घेतली आहे. पारंपारिक मिठाईची जागा रेडिमेड मिठाईने घेतली आहे. एकेकाळी ख्रिसमसचा खास आकर्षण असलेला घरासमोरचा क्रिब कधीचाच गोव्यातून हद्दपार झाला आहे.
गोव्याची परंपरा अजूनही जपून ठेवण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यासाठी स्वत:ची सगळी पुंजी ओतून बाणावली येथे ‘गोवा चित्र’ व ‘गोवा चक्रा’ असे दोन म्युझियम उघडणारे व्हिक्टर हय़ूगो गोमीस यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणतात, पूर्वी प्रत्येक घरांसमोर क्रिबचा देखावा तयार केलेला असायचा. प्रत्येकवर्षी या देखाव्यात कुठले तरी खास आकर्षण असावे यासाठी एक महिना अगोदरच तयारी चालायची. ख्रिसमस यायला पाच दिवस बाकी असताना नाचणी एका कपडय़ात घट्ट बांधून ठेवून ती पाण्यात घालून त्याला कोंब काढण्याचे काम सुरु व्हायचे. तीन-चार दिवसात या नाचणीला हिरवेगार कोंब फुटायचे. हेच कोंब क्रिबसमोर हिरवळ तयार करण्यासाठी वापरले जायचे.
घरातील महिला वेगवेगळ्या तरेच्या मिठाई करण्यास गर्क असायच्या. दुस-याबाजूने लहान मुले आणि तरुण बाबूंच्या काठय़ा वापरुन स्टार तयार करण्यास मग्न असायचे. दिव्याच्या गरमीवर गरगर फिरणारा ‘लापयांव’ (कंदील) तयार करण्याचीही मुलांमध्ये चढाओढ असायची. या लापयांवांवर वेगवेगळ्या तरेची नक्षी रेखाटली जायची. ख्रिसमसची ही तयारी मुख्य उत्सवांपेक्षाही अधिक उत्साहपूर्ण असायची. गोमीस म्हणतात, ख्रिसमस हा केवळ गोडधोड खायचाच सण नव्हता तर सर्व कुटुंबीय एकत्र येऊन आपल्या गुजगोष्टी करत या सणात समरस होणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र आता हे समरस होणोच बंद झाले आहे. घरासमोरील क्रिब आता कमी होत चालले असून त्याजागी गावातील मध्यवर्ती ठिकाणी एक मोठा क्रिब उभा करुन त्यावर आपली इच्छा भागविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. एवढेच नव्हे तर ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना दिली जाणारी ‘कोन्साद’ (ख्रिसमसच्या मिठायांच्या भेटीची देवाणघेवाण) हा प्रकारही आता बंद झाला आहे.
गोव्याची पारंपारिकता राखून ठेवण्यास हातभार लावणारे आणि लोटली येथे ‘एन्सेस्ट्रल गोवा’ ही पुरातन गोव्याची प्रतिकृती उभारणारे महेंद्र आल्वारिस यांनीही गोव्यातील नाताळ बदलू लागल्याचे मान्य केले. आपल्या बालपणाच्या आठवणीत रमताना आल्वारिस म्हणाले, त्यावेळी आमच्या लोटलीत वीज नव्हती. त्यामुळे स्टारमध्ये केरोसिनचा दिवा ठेवून उजेड  करावा लागायचा. हा स्टार उंचावर टांगला जायचा आणि ज्यावेळी तो पेटवायचा असे त्यावेळी दोरीवरुन तो खाली उतरविला जायचा. त्यात पेटता केरोसिनचा दिवा ठेवून तो पुन्हा चढविला जायचा. एक दिव्याचा उजेड सुमारे तीन तास चालू असायचा. दिवा विझल्यावर पुन्हा तो स्टार खाली उतरविला जायचा.
ते म्हणतात, पूर्वी जी सजावट केली जायची तीही जवळपास उपलब्ध असलेल्या सामानांतूनच. क्रिब एक तर लाकडाच्या पट्टय़ा वापरुन केला जायचा किंवा पुठ्ठय़ाचा. त्यावेळी वीज नसल्याने डायनामोवर पेटल्या जाणा-या बॅटरीच्या दिव्याचा वापर केला जायचा. बहुतेक हा दिवा त्यावेळच्या सायकलींना बसविलेला असायचा. याच दिव्याला रंगीत कागद बांधून कुणी क्रिब पाहण्यास आल्यानंतर सायकलीची पेडल मारुन हा कृत्रिम उजेड तयार केला जायचा. ख्रिसमस ट्रीही वडाच्या फांदय़ा बांबूला बांधून तयार केली जायची. डिसेंबरात वडाला लाल फळे येतात. ही लाल फळे या ख्रिसमस ट्रीचे आकर्षण असायचे. या ट्रीला वेगवेगळ्या प्रकारचे कागद गुंडाळून ती सजविली जायची. वेगवेगळ्या तरांचे आकर्षक ‘लापयांव’ तयार केले जायचे. मात्र आज या सा-या गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत. आजची सजावट ही केवळ चिनी बनावटीच्या लायटींग पुरतीच मर्यादित उरली आहे.
पूर्वी गोव्यातील बहुतेक ख्रिश्चन गोव्याबाहेर कामाला असायचे. काहीजण जहाजावर नोकरी करायचे. मात्र ख्रिसमसच्यावेळी हे सर्व गोंयकार आवर्जून आपल्या घरी यायचे. आज ही सुद्धा परंपरा मागे पडू लागली आहे. अजुनही काहीजण काही दिवसांसाठी का होईना पण ख्रिसमसला आपल्या घरी येतातही. मात्र पूर्वीचा ख्रिसमस पहाण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नसते. त्यामुळे गावात केलेले देखावे आणि एन्सेस्ट्रल गोवासारख्या म्युझियममध्ये साजरा केला जाणारा पारंपारिक ख्रिसमस पाहून पूर्वीच्या आठवणी काढण्याशिवाय त्यांच्या हाती दुसरे काही नसते.

Web Title: According to Carnival, the traditional Christmas in Goa is also a history, now only solution to the energy harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.