खातेवाटप सोमवारी
By admin | Published: March 18, 2017 02:49 AM2017-03-18T02:49:17+5:302017-03-18T02:52:32+5:30
पणजी : प्रादेशिक आराखड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेले नगर नियोजन खाते मंत्री विजय सरदेसाई यांना तर नगरपालिकांच्या
पणजी : प्रादेशिक आराखड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेले नगर नियोजन खाते मंत्री विजय सरदेसाई यांना तर नगरपालिकांच्या क्षेत्रातील विकासाबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे नगर विकास खाते मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शुक्रवारी आपल्या खात्यांचे वाटप करणार होते; पण त्यांनी ते केले नाही. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा गोव्याबाहेर आहेत. येत्या सोमवारी त्या गोव्यात दाखल होतील व त्या वेळीच मुख्यमंत्री खातेवाटप करून त्याच दिवशी अधिसूचना जारी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
काही मंत्र्यांचे मत पर्रीकर यांनी खात्यांबाबत जाणून घेतले आहे. महत्त्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडे ठेवावी, असा प्रयत्न मुख्यमंत्री करतील. विजय सरदेसाई यांना नगर नियोजन खाते देण्याचे तत्त्वत: ठरले आहे. अगोदर त्यांना नगर विकास खाते दिले जाईल, अशी चर्चा होती. यापूर्वी नगर नियोजन खाते फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे होते. डिसोझा यांनी तीन तालुक्यांचे सुधारित प्रादेशिक आराखडे तयार करून घेतले होते. उर्र्वरित आराखडे तयार झालेले नाहीत.
अपक्ष मंत्री गोविंद गावडे यांना अनुसूचित जमाती कल्याण खाते दिले जाऊ शकते. ते दिले नाही तर, कृषी किंवा कला व संस्कृती खातेही दिले जाऊ शकते, अशी माहिती मिळाली. गोवा फॉरवर्डचे मंत्री व शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांना जलसंसाधन तर याच पक्षाचे दुसरे एक मंत्री जयेश साळगावकर यांना पंचायत खाते मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना महसूल किंवा उद्योग खाते दिले जाईल. जर महसूल त्यांच्याकडे सोपविले नाही तर ते मंत्री पांडुरंग मडकईकर यांना दिले जाऊ शकते. मडकईकर यांना क्रीडा खातेही मिळण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमाती कल्याण खात्यासाठीही मडकईकर यांच्या नावाचा विचार भाजपमध्ये सुरू आहे. बाबू आजगावकर यांचे खाते कोणते असेल ते स्पष्ट झाले नाही. सुदिन ढवळीकर यांना बांधकाम व वाहतूक हीच खाती मिळतील.
(खास प्रतिनिधी)