बोगस पद्धतीने कर्जे घेणाऱ्यांवर कारवाई; मंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 01:03 PM2024-02-27T13:03:05+5:302024-02-27T13:03:33+5:30
माशेल येथील महिला अर्बनमधील गैरव्यवहार २०२२-२३ पूर्वी झालेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : व्हिजनरी, माशेल येथील महिला अर्बन व डिचोली येथील अष्टगंधा बँकेतून बोगस पद्धतीने कर्जे घेतलेल्यांवर कारवाई केली केली जाईल, तसेच ज्यांनी योग्य प्रकारे कर्जे घेतलेली आहेत, ती वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, व्हिजनरी, माशेल येथील महिला अर्बनमधील गैरव्यवहार २०२२-२३ पूर्वी झालेले आहेत. सहकार खात्याने याची गंभीर दखल घेऊन दोन ते तीन वेळा आदेशही काढले आहेत. ज्यांनी बोगस पद्धतीने कर्जे घेतलेली आहेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे कारवाई करावी लागेल. आम्ही ती कडकपणे करणार आहोत. कर्जे वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी येत्या डिसेंबरपर्यंत परत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या तिन्ही बँका खात्याने रेड कॅटेगरीत टाकलेल्या आहेत. माशेल अर्बनमध्ये तब्बल १८ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांकडून गुन्हेही नोंद झाले आहेत. संचालक मंडळात माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जुने गोवेच्या माजी सरपंच जेनिता मडकईकर यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे. काही जणांना नियमांचे उल्लंघन करून अवैधरीत्या कर्जे देण्यात आली.
म्हापसा अर्बन बँक पतसंस्था म्हणून पुनरुज्जीवित करणार
दिवाळखोरीत जाऊन बंद पडलेली म्हापसा अर्बन बँक पतसंस्था म्हणून पुनरुज्जीवित करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. सरकार त्या दृष्टिकोनातून सकारात्मकदृष्ट्या विचार करीत असल्याचे शिरोडकर म्हणाले. या बँकेमध्येही लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.