खनिज ट्रकांविरुद्ध कारवाई
By admin | Published: April 26, 2016 01:38 AM2016-04-26T01:38:57+5:302016-04-26T01:47:32+5:30
पणजी : राज्यात खनिज वाहतूक करणारे ट्रक ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहतूक करत असल्याचे आढळून
पणजी : राज्यात खनिज वाहतूक करणारे ट्रक ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहतूक करत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सरकारच्या खाण खात्याने सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यात तिळामळ-केपे येथे एका खनिजवाहू ट्रकाने दोघींचा बळी घेतल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खनिज ट्रकांचा वेग ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त असू नये, असा आदेश दिला होता. त्यानुसार खाण खाते ट्रकांच्या वाहतुकीवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे (जीपीएस) लक्ष ठेवू लागले आहे. जेटींवरून खाणींवर खनिज माल आणताना सुमारे ५३८ ट्रकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे रविवारी खाण खात्याला आढळून आले व त्यानंतर लगेच कारवाई सुरू झाली.
एका दिवसासाठी या ५३८ ट्रकांची खनिज वाहतूक निलंबित करण्यात आली. त्यामुळे सोमवारी हे ट्रक वाहतूक करू शकले नाहीत. खाण खात्याला वेगमर्यादेचे उल्लंघन आढळून आले की, लगेच ट्रकचालकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवला जातो व त्यांना पुढील चोवीस तासांसाठी वाहतूक करणे बंद ठेवण्याची सूचना जाते. खाण कंपन्यांनाही त्याबाबतचा अहवाल जातो. खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची खाण खात्याकडे नोंदणी आहे. शिवाय चालकांच्या मोबाईल क्रमांकाचीही नोंद आहे. या ट्रकांना जीपीएस व्यवस्था आहे. यापुढे खडी व रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांचीही अशाच प्रकारे नोंदणी करून त्यांनाही चाळीस वेगमर्यादा लागू करण्याचे खाण खात्याने तत्त्वत: ठरविले आहे, असे सूत्रांनी सांगितले. एखादा खनिजवाहू ट्रक वारंवार वेगमर्र्यादेचे उल्लंघन करू लागला, तर त्याविरुद्ध महिनाभराचीही कारवाई केली जाणार आहे.
(खास प्रतिनिधी)