ऑडिट न करणाऱ्या अर्बन बँकांवर कारवाई; सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 11:43 AM2024-02-29T11:43:09+5:302024-02-29T11:44:17+5:30
सप्टेंबरमध्ये बँकांचा आढावा घेणार.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील काही अर्बन बँकांनी अद्याप ऑडिट केलेले नाही. त्यामुळे अर्बन बँकांचा हा डोळेझाकपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. म्हणूनच बँकानी तातडीने ऑडिट करून घ्यावे, सप्टेंबर महिन्यात मी त्याचा आढावा घेणार आहे, असा इशारा सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे.
मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले, अर्बन बँकांनी शेती कर्ज द्यायला हवे. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत, तो पैसा ठेवून वाढत नाही हे लक्षात घ्यायला हवे. शेतकऱ्यांना सहाय्य करणे हे बँकाचे काम आहे. सगळ्या संस्था मजबूत करण्यासाठी संचालक, चेअरमन यांना प्रशिक्षण देण्यात आले असून यापुढेही देण्यात येईल. सत्तरी आणि फोंडा तालुक्यातून सर्वात जास्त तर मुरगाव तालुक्यातून सर्वात कमी कृषी कर्ज उचल झाली आहे. शेतकऱ्यांचे अनुदान दोन महिन्यांनी दहा तारखेला जमा केली जाईल, असे सांगून बँकांनी दर सोमवारी दुपारी १२ वाजता आपला डाटा सादर करावा, असेही ते म्हणाले.
मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमानंद चावडीकर यांना सहकार रत्न, सतीश वेळीप यांना सहकार भूषण व जयवंत आडपईकर यांना सहकार श्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना अनुक्रमे एक लाख ७५ हजार, ५० हजार व चवडीकर यांना मानपत्र तर नाईक व आडपईकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी असिस्टंट टू इंडिविज्युल पुरकार उल्हास फळदेसाई व चंद्रशेखर च्यारी (कुमयामळ- साळ) यांनाही पुरस्कार देण्यात आला.