कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-यावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 02:47 PM2017-10-27T14:47:34+5:302017-10-27T14:48:01+5:30
विक्री प्रदर्शनात अशास्त्रीय वैद्यकीय स्वरुपाचे दावे करुन बनावट उत्पादने विकण्याचे प्रकार वाढू लागले असून अशाचप्रकारे कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-या एका स्टॉलवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई केली आहे.
मडगाव : शहरात आयोजित केल्या जाणा-या विक्री प्रदर्शनात अशास्त्रीय वैद्यकीय स्वरुपाचे दावे करुन बनावट उत्पादने विकण्याचे प्रकार गोव्यात वाढू लागले असून मडगावात अशाचप्रकारे कॅन्सरवर गुणकारी अशी जाहिरात करुन तांब्याच्या बाटल्या विकणा-या एका स्टॉलवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कारवाई केली आहे.
गुरुवारी ग्राहक चळवळीतील कार्यकत्र्याच्या नजरेस ही गोष्ट आल्यानंतर या स्टॉलच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन खात्याकडे तक्रार केली होती. या प्रदर्शनात बंगळुरु येथील एका उत्पादकाने विकण्यासाठी तांब्याच्या फ्लास्कसारख्या बाटल्या ठेवल्या होत्या. या बाटल्यात भरुन ठेवलेले पाणी पिल्यास कॅन्सरसारख्या व्याधीही दूर होतात अशी जाहिरात करण्यात आली होती. यापूर्वी मडगावात भरलेल्या आणखी एका प्रदर्शनात एडस्वर गुणकारी अशी जाहिरात करुन एका विशिष्टतरेच्या बिया विकण्याचा प्रयत्न झाला होता. हाही प्रयत्न ग्राहक चळवळीत अग्रेसर असलेल्या गोवा कॅन या संघटनेने हाणून पाडला होता. त्यानंतर या स्टॉल धारकावर अन्न व औषध प्रशासन खात्याने जादुई उपचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला होता.
यासंदर्भात गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना अशा प्रदर्शनात खोटय़ा जाहिराती करुन उत्पादने विकली जातात. ज्यांचा कित्येकवेळा थेट आरोग्याशी संबंध असतो त्यामुळे अशा घटनांकडे अन्न व औषध प्रशासन गंभीरतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. अशी प्रदर्शने भरविताना अशाप्रकारच्या उत्पादनाला प्रतिबंध आणण्यासाठी या खात्याने उपाययोजना हाती घेण्याची मागणी त्यांनी केली.
यासंबंधी अन्न व औषध प्रशासन खात्याचे संचालक सलीम वेलजी यांच्याशी संपर्क साधला असता, अशाप्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी खात्याने पाऊले उचलली असून यासंबंधी लवकरच खात्यातर्फे सूचना जारी केल्या जातील असे त्यांनी सांगितले.