पणजीमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री, दंडात्मक कारवाई सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:36 PM2018-12-04T13:36:21+5:302018-12-04T23:28:33+5:30
गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
पणजी : गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याच्याकडून पिशव्यांची ६ बंडले जप्त करण्यात आली. सकाळी पालिकेचा निरीक्षक आणि त्याच्यासोबत अन्य ५ अधिकारी मार्केटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली. प्लास्टिक पिशव्या विकणा-याला ५ हजार रुपये आणि दुस-यांदा हाच गुन्हा केल्यास १0 हजार रुपये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणा-या ग्राहकालाही १ हजार रुपये दंड ठोठावला जात आहे.
कारवाईचा सुगावा लागल्यावर काही विक्रेत्यांनी माल आवरुन तेथून काढता पाय घेतला त्यामुळे काही वेळ कारवाई थांबवून नंतर काही तासांनी अधिका-यांनी गुपचूपपणे धाडी सुरु केल्या. ग्राहकांनाही प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे. काही ग्राहकांना अधिका-यांनीअडवून त्यांनी कुठल्या दुकानातून किंवा विक्रेत्याकडून या पिशव्या खरेदी केल्या याची चौकशी केली आणि त्यानुसार संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. ५0 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैटकीत घेण्यात आलेला आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप यावर बंदी घालण्यात आली असून केवळ कापडी, कागदी व काथ्याच्या पिशव्याच वापराव्या लागतील.
मनपाच्या मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मासळी बाजारात येणा-या ग्राहकांसमोर मासळी घरी कशी न्यावी हा प्रश्न आहे. कागदी पिशव्यांमध्ये ती घातल्यास पाणी गळते आणि पिशवी फुटून मासळी सांडण्याचाही धोका असतो. त्यामुळे या ग्राहकांनी प्लास्टिकची छोटी बकेट वापरावीत, असा सल्ला महापालिकेने दिला आहे.
महापौर विठ्ठल चोपडेकर म्हणाले की, पावसाळ्यात गटारांमध्ये प्लास्टिक अडकते आणि त्यामुळे पाणी तुंबून शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे. आतापर्यंत कारवाईत प्लास्टिक पिशव्या जप्त करुन आणल्या जात होत्या. आता थेट दंड आकारणी सुरु केलेली आहे.