अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल; पुलावमधील अळ्या प्रकरणी शिक्षण खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:06 PM2023-09-28T13:06:52+5:302023-09-28T13:07:14+5:30
अळ्या आढळून आलेल्या माध्यान्ह आहाराबाबतचा अहवाल अजूनही अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) आलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सावईवेरे, वळवई व केरी भागातील शाळांमध्ये पुरवलेल्या माध्यान्ह आहारात मंगळवारी अळ्या •आढळून आल्या. या शाळांना माध्यान्ह आहार पुरवणारा मंगेशी येथील स्वयंसहाय्य गट हा एकूण ४० शाळांना आहार पुरवत आहे. मात्र, या प्रकरणाचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो मिळाल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. तसेच यात जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलच, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.
अळ्या आढळून आलेल्या माध्यान्ह आहाराबाबतचा अहवाल अजूनही अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) आलेला नाही. या अहवालात जर कोणी दोषी असल्याचे आढळले तर निश्चितच कारवाई करू. यात संबंधित स्वयंसेवी गटाला कारणे दाखवा नोटीसही बजावली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावईवेरे, वळवई व केरी भागातील काही शाळांमध्ये माध्यान्ह आहारा अंतर्गत पुरवलेल्या पुलावात विद्यार्थ्यांना अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या पुलावाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र अजूनही त्याचा अहवाल आलेला नाही. या अहवालाच्या आधारेच शिक्षण खाते पुढील कारवाई करणार आहे. शिक्षण खात्याकडूनही चौकशी केली जात आहे.
शिक्षण संचालक झिंगडे म्हणाले, की या पुलावात सोयाबीन होते. अळ्या या सोयाबीनमध्ये होत्या, असे न कंत्राटदाराकडून सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष स्थिती हे अहवाल आल्यानंतरच समजेल. या शाळांना जो स्वयंसहाय्य गट माध्यन्ह आहार पुरवत आहे, तो एकूण ४० शाळांना हा आहार पुरवत आहे. त्यामुळे अन्य शाळांमध्ये असा प्रकार आढळून आला नाही. विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार हा देणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तरी या गटाला हा आहार पुरवण्यास बंद करा, असे कुठलेही निर्देश दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक रडारवर
माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्याच्या वृत्तामुळे राज्यातील सर्वच पालकांना चिंता वाटू लागली आहे. त्या आहारात अळ्या होत्या की नाही हे नंतर स्पष्ट होणारच आहे. परंतु शिक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुलांना आहार देण्यापूर्वी त्याची संबंधित शिक्षकाकडून पाहणे करणे, त्याची चव तपासणे सक्तीचे आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिकाही या प्रकरणात रडारवर आली आहे.
१४ दिवसांची प्रतीक्षा
माध्यान्ह आहारात अळी सापडण्याच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी शिक्षण खात्याला १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण माध्यान्ह आहारात खरोखरच अळी होत्या हे गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट होणे आवश्यक आहे आणि अहवालासाठी किमान १४ दिवस तरी लागणार आहेत.
दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री
विद्यार्थ्यांच्या आहारात अळ्या आढळणे हे चिंतेची बाब आहे. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. सावईवेरे व केरी भागातील शाळांमध्ये घडलेला प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अहवाल आल्यानंतर याती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.