क्रॉस मसाजच्या तक्रारींमुळे गोव्यातील स्पांविरोधात कारवाई होणार - आरोग्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 01:43 PM2018-03-03T13:43:14+5:302018-03-03T13:43:14+5:30
गोव्यातील स्पामधून क्रॉस मसाज केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य खात्याने या तक्रारींची दखल घेत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पणजी : गोव्यातील स्पामधून क्रॉस मसाज केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य खात्याने या तक्रारींची दखल घेत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सर्व स्पांना आरोग्य खात्याचे अधिकारी अचानक भेट देऊन तपासणी करतील व काही ठिकाणी छापेही टाकले जातील व दोषी स्पा व्यावसायिकांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा शनिवारी सरकारने दिला आहे. उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत पर्यटनाची खूप वाढ झाली आहे. वाढत्या पर्यटनासोबत स्पांची संख्याही वाढली. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, म्हापसा अशा मोठ्य शहरांसह मिरामार, दोनापावल, कळंगुट, कांदोळी, बागा, हरमल, मोरजी, सिकेरी, वागातोर, बांबोळी, कोलवा, पाळोळे, पाटणो अशा किनारपट्टीत हजारो स्पा आहेत. गेल्या आठ वर्षात स्पांची संख्या वाढत गेली. पर्वरीसारख्या छोट्या भागातही स्पा वाढले. अनेक स्पामधून क्रॉस मसाज केले जात असल्याच्या तक्रारी आरोग्य खात्याकडे येऊ लागल्या आहेत.
यापूर्वी पोलिसांनी अनेक स्पांवर छापे टाकून शरीर विक्रीचे धंदेही उजेडात आणले आहेत. अनेक दलालांना अटक करून काही स्पांविरुद्ध कारवाईही करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातील ठराविक स्पांमध्ये जाण्याचे धाडस आता ग्राहकही करत नाहीत. गोव्यात येणारे लाखो पर्यटक हे स्पांमध्ये जातात. काही स्पा चांगले आहेत, तर काही स्पाविरुद्ध तक्रारी येत आहेत. मसाज करण्याच्या नावाखाली कसलेही धंदे स्पामध्ये चालतात अशा तक्रारी पर्यटकांकडूनही ऐकू येतात.
आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला. सर्व स्पांची तपासणी करण्याची सूचना आपण अधिका-यांना केली आहे. येत्या आठवड्यात तपासणी सुरू होईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. महिलांनी पुरुषांना व पुरुषांनी महिलांना मसाज करणे अशी क्रॉस पद्धत अवलंबिण्यास बंदी आहे. ते गैर असल्याने स्पा व्यावसायिकांनी त्यापासून दूर रहावे. आरोग्य खात्याकडे परवाने देण्याची व नोंदणी करण्याची जबाबदारी असते. आरोग्य खात्याकडून छापे टाकले जातील व दोषी आढळणा-या स्पांचे परवाने थेट रद्द केले जातील. काही स्पांवर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.