कळंगुट किनारी भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:30 PM2019-08-22T13:30:38+5:302019-08-22T13:37:11+5:30

जगप्रसिद्ध अशा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांना या पुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Action will be taken against those who consume alcohol in the calangute beach goa | कळंगुट किनारी भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई 

कळंगुट किनारी भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई 

Next

म्हापसा - जगप्रसिद्ध अशा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांना या पुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणाऱ्यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे. 

पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहिनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत क्षेत्रातील किनारी भागात रस्ते तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी दारुच्या सेवनावर बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा एकादा गट दारुचे सेवन करताना आढळल्यास व्यक्तीवर गोवा पर्यटन सुरक्षा व व्यवस्थापन कायदा २००१ अंतर्गतच्या कलम ९ अ (२) खाली २ हजार रुपयांची तर गटावर १० हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. लागू केलेला दंड जमा करण्यास नकार दर्शवील्यास त्याच्यावर कलम १० (१) अंतर्गत कारवाई करण्यात येईल. या कायद्याखाली केलेला गुन्हा हा अदखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंद केला जाईल व दोषी आढळून आल्यास संबंधीतांना किमान ३ महिन्यांची तसेच जास्तीत जास्त ३ वर्षापर्यंत कारागृहाची शिक्षा सुद्धा होवू शकते. असाही इशारा त्यातून देण्यात आला आहे. 

कळंगुट भागात दरवर्षी लाखोंनी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. त्यांच्याकडून दारुचे सेवन केल्यानंतर रिकाम्या बाटल्या उघड्यावर टाकून दिल्या जातात. काहीवेळा त्या फोडून सुद्धा टाकल्या जातात. या आदेशामुळे या प्रकारावर नियंत्रण बसणार आहे. सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधीचा ठराव २ ऑगस्टच्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. घेतलेल्या ठरावानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. 

उघड्यावर दारू सेवनात लागू केलेल्या बंदी बरोबर उघड्यावर कचरा टाकण्यास बंदी करणारा आदेश सुद्धा पंचायतीच्या वतिने लागू करण्यात आला आहे. तसेच कचºयाचे वर्गीकरण करण्याची सक्ती सुद्धा करण्यात आली आहे. कसल्याच प्रकारचा कचरा रस्त्यावर सार्वजनीक ठिकाणी किंवा गटारात टाकण्यात येवू नये असे त्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गोळा झालेला कचरा आपल्या हद्दीत जमा करुन ठेवण्याची जबाबदारी पंचायत क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीची राहणार असून सदरचा कचरा पंचायतीकडून गोळा होईपर्यंत हद्दीतच निश्चित करण्यात आलेल्या जागेत ठेवण्यात यावा असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. 

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर घनकचरा नियंत्रण कायदा १९९६ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. या कायद्याच्या कलम ५ (अ) अंतर्गत रहिवासियांवर पहिल्या गुन्ह्यासाठी २०० रुपये दंड, दुसºया गुन्ह्यासाठी ५०० रुपये दंड तर त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांचा दंड किवा कारावासाची शिक्षा देण्यात येणार आहे. कायद्याच्या कलम ५ (ब) अंतर्गत व्यवसायिक आस्थापनांवर पहिल्या गुन्ह्यासाठी २ हजार रुपयांचा दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांचा दंड व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपयांचा दंड किवां कारावासाची शिक्षा देण्यात येणार आहे. 

या संबंधी मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतीच्या वतीने फक्त पंचायत क्षेत्रातील वर्गीकरण करण्यात आलेला कचरा गोळा केला जाणार आहे. तसेच ज्या आस्थापनांकडून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार नाही अशा आस्थापनांचा किंवा व्यवसायीकांना कारणे दाखवा नोटिस पाठवून त्यानंतर त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पंचायतीच्या वतिने सध्या घरा घरातून कचरा गोळा करण्यावर भर दिला जात असून ज्या परिसरातून कचरा गोळा केला जात नाही तो भाग पंचायतीच्या निदर्शनाला आणून देण्यात यावा असेही आवाहन मार्टीन्स यांनी केले आहे. स्वच्छ व सुंदर पंचायत क्षेत्रासाठी पंचायत कटीबद्ध असून लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

Web Title: Action will be taken against those who consume alcohol in the calangute beach goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.