खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 13:24 IST2024-12-16T13:23:34+5:302024-12-16T13:24:06+5:30
साखळीत विकासाला चालना; कचरासमस्या स्थानिकांनी सहकार्य करावे

खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : रस्त्याच्या बाजूला फळे व इतर सामान विक्री करणाऱ्यांकडून कचरा केला जातो. त्यांना हटविण्याची कारवाई करा, वाईन शॉपवरून बीअर व इतर दारू खरेदी करून रस्त्याच्या बाजूला किंवा खुल्या जागेत मद्यपान करण्याचे प्रकार वाढले आहेत. असे लोक रस्त्यावर किंवा खुल्या जागेत बाटल्या फोडतात व काचांचा खच करतात. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, युवतींची छेड काढतात. हे सहन केले जाणार नाही. असले प्रकार बंद व्हायला हवेत. त्यासाठी कडक पावले उचलणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.
साखळी नगरपालिकेतर्फे सुमारे १.२५ कोटी खर्चुन हाऊसिंग बोर्ड येथे साकारलेल्या फुटसाल मैदानाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेविका रश्मी देसाई, यशवंत माडकर, निकिता नाईक, दयानंद बोर्येकर, प्रवीण ब्लेगन, रियाझ खान, ब्रह्मानंद देसाई, दीपा जल्मी, अंजना कामत, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, पालिका कनिष्ठ अभियंता सुभाष म्हाळशेकर, जयेश कळंगुटकर व इतरांची उपस्थिती होती.
आज कचऱ्याच्या समस्येवर गांभीर्याने पाहताना घरांबरोबरच भाडेपट्टीवर राहणाऱ्यांचाही कचरा कर घ्यावा. अन्यथा हे लोक कचरा उघड्यावर फेकतात. कचरा उघड्यावर फेकताना आढळल्यास प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी ओळखून पोलिस तक्रार करावी. साखळी नगरपालिकेला लहान शहरात स्वच्छ नगरपालिका म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार यापुढेही कायम ठेवण्यासाठी लोकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
स्वागत नगरसेविका रश्मी देसाई यांनी करताना, हा प्रकल्प साकारण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सर्व सहकारी नगरसेवकांनी चांगले सहकार्य केले. साखळीच्या युवांसाठी वरदान असा हा प्रकल्प असून, त्यातून नगरपालिकेलाही महसूल प्राप्ती होणार आहे, असे म्हटले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते फुटसाल मैदानाचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी केले पालिकेचे कौतुक
नगरपालिका मंडळ व सर्व नगरसेवक आपापल्या भागात उत्कृष्ट काम करीत असल्याने साखळी शहर आज विकासाकडे जात आहे. या कामांबरोबरच लोकांना सहज उपयोगी पडणाऱ्या सेवा पुरविण्यावर प्राधान्य द्या. फुटसाल मैदानाची निगा राखणे व त्यावर स्थानिकांना खेळण्यास देणे याबाबत गंभीरपणे लक्ष द्या, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लोकांच्या सहकार्यानेच कामे पूर्णत्वास : प्रभू
साखळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू म्हणाल्या, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पालिकाक्षेत्रात विकासकामे होत आहे. साखळीवासीयांच्या नजरेतील सर्वच कामे पालिका मंडळाने पूर्ण केली आहेत. लोकांकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे नगरपालिका काम करीत असल्याने प्रत्येक प्रकल्पाला लोकांकडून भरभरून सहकार्य मिळते, असे म्हटले आहे.