ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
By समीर नाईक | Published: March 4, 2024 04:40 PM2024-03-04T16:40:50+5:302024-03-04T16:41:07+5:30
अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली.
पणजी: राष्ट्रपती यांच्याकडे विषय पोहचवणार या मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांच्या आश्वासनानंतर, ईव्हीएम विरोधातील आंदोलन लोकांनी मागे घेतले. या दरम्यान पोलिस आणि आंदोनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला, ज्यातून ॲड. प्रतिमा कुतीन्हो, मन्सूर शेख व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
सोमवारी सकाळपासून राज्यातील लोकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिन्हो येथील बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, ज्यातून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली.
अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली. या शिष्टमंडळमध्ये दिल्लीतील ॲड. भानुप्रताप सिंग, डी. सी कपिल, रमा काणकोणकर, शंकर पोळजी यांचा समावेश होता. सीईओच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आहे.
देशात ईव्हीएम विरोधात आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही राज्यातही हे आंदोलन केले आहे. आमची एवढीच मागणी आहे की पुढील निवडणुका की बॅलेट पेपेर च्या माध्यमातून व्हावी. बॅलेट पेपेरद्वारे झालेली निवडणुका पारदर्शक निवडणुका असणार आहे. कारण ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या एजन्सी मधील ७ पैकी ४ हे भाजपचेच पदाधिकारी आहेत, त्यामुळे भाजपच ईव्हीएम मशीन हाताळत आहे, असाच होतो. त्या अनुषंगाने हे आंदोलन आहे, असे ॲड. भानुप्रताप सिंग यांनी यावेळी सांगितले.
शांततेत चाललेले हे आंदोलन पोलिसांमुळे चिघळले. हे भाजप सरकारचाच आदेश असणार. यातून स्पष्ट होते की लोकांना दाबून ठेवण्यासाठी सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करत आहे. जर भविष्यात भाजप सत्तेवर आल्यास, लोकशाही संपणार व हुकूमशाही सुरू होणार आहे, असेही ॲड. सिंग यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सुमारे १ लाख लोकांनी ईव्हीएम विरोधात हस्तांक्षर करत त्याचे पेपेर आमच्याकडे दिले आहेत. अजून आम्ही ताळागाळात पोहचलेलो नाही. ही संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी देखील यावर विचार करणे आवश्यक आहे. गोमंतकीयांनी खूप धाडस दाखविले आहे. हे आंदोलन देशभर होत असले तरी, गोव्यापासूनच बॅलेट पेपेर वरील निवडणुका सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी रामा काणकोणकर यांनी सांगितले.