कार्यकर्ते सांगताहेत, खासदारकीसाठी तुम्ही लढाच! माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:41 AM2023-12-29T11:41:16+5:302023-12-29T11:41:24+5:30

पणजी येथील 'लोकमत' कार्यालयास परुळेकर यांनी भेट दिली.

activists say you must fight for mp former minister dilip parulekar expressed his sentiments | कार्यकर्ते सांगताहेत, खासदारकीसाठी तुम्ही लढाच! माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केल्या भावना

कार्यकर्ते सांगताहेत, खासदारकीसाठी तुम्ही लढाच! माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्यातून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली असताना माझे समर्थक, हितचिंतक, कार्यकर्ते माझ्याकडे खासदारकी तुम्हीच लढवा, असा जोर धरू लागले आहेत. साळगावसह उत्तर गोव्यातील अनेक लोक व कार्यकर्ते मला भेटून हे बोलून दाखवतात. पण श्रीपादभाऊंना टाळून मला उमेदवारी नको. पक्ष जर भाऊ व्यतिरीक्त अन्य पर्यायांचा विचार करत असेल तरच मला उमेदवारी द्यावी, अशी नम्र 'भावना माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल व्यक्त केली.

पणजी येथील 'लोकमत' कार्यालयास काल, गुरुवारी परुळेकर यांनी भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभेसाठी भाजप उमेदवारीसाठी एवढे दावे होत आहेत तर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मीही या शर्यतीत असल्याचे परुळेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. मी आयुष्यात कधी पक्ष बदलला नाही व यापुढेही मी भाजप कधी सोडणार नाही असे परुळेकर म्हणाले.

आतापर्यंतच्या माझ्या राजकीय कार्यर्किदीत मी भाजपसोबत प्रामाणिक राहिलो, जसे श्रीपादभाऊ देखील राहीले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जर काही कारणास्तव त्यांचे वगळत असतील तर त्यांनी माझा विचार करावा. २००७ साली साळगावात मी डॉ. विलींना हरवून जाईट किलर ठरलो होतो. त्यावेळी जो लोकसंपर्क होता, तो आजही कायम आहे. यावेळेस लोकसभेच्या राज्यातील दोन्ही जागांवर भाजपचाच विजय निश्चित आहे. त्यामुळे माझ्यासह आणखी काहीजण लोकसभा निवडणूक लढवू पाहत आहे, असे परुळेकर म्हणाले.

मला जर भाजपने तिकीट दिले तर, मी जिंकेनच, मात्र भाऊंचे तिकीट कट करा व मला द्या अशी माझी भूमिका नाही, असेही परुळेकर यांनी नमूद केले. श्रीपादभाऊ हे भाजपमध्ये आमचे आराध्यदैवत आहे, असेही परुळेकर म्हणाले.

पर्रीकर नसते तर....

भाजप सदस्य नोंदणी मोहीम जेव्हा राज्यात राबविण्यात आली, तेव्हा या मोहीमेची जबाबदारी माझ्यावर होती. या दरम्यान संपूर्ण राज्यभर फिरुन मी सदस्य नोंदणी केली, त्यावेळी उत्तर गोवा तर मी पिंजून काढला होता. जवळपास ४ लाख, ७० हजार नोंदणी केली होती, असे परुळेकर यांनी सांगितले. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या साठाव्या वाढदिन सोहळ्याचाही मी प्रमुख होतो, तेव्हाही राज्यभर काम केले होतेच. मी पर्यटन मंत्री म्हणून खूप काम केले. पर्रीकर जर नसते तर माझ्यासारखे सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते कधीच आमदार, मंत्री होऊ शकले नसते असेही परुळेकर म्हणाले. काँग्रेसमधून जे आयात करून भाजपमध्ये आमदार आणले गेले, त्यातून कार्यकर्ते दुखावले आहेत. अजून ती नाराजी अनेक ठिकाणी आहे. असे परुळेकर म्हणाले.

ब्रह्मेशानंद स्वामींच्या नावाची चर्चा, पण...

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. पण ही चर्चा फक्त लोकांमध्येच आहे. भाजप पक्षाच्या कोणत्या व्यासपीठावर मी ती चर्चा ऐकलेली नाही. ब्रह्मेशानंद स्वामींना उमेदवारी देण्याचा विचार जर होऊ शकतो तर नाणीजच्या नरेंद्र स्वामींना का नाही? असा प्रश्न नाणीज महाराजांचे काही अनुयायी आम्हाला करतानाही मी ऐकले आहे, असे परुळेकर एका प्रश्नास उत्तर देताना म्हणाले.

 

Web Title: activists say you must fight for mp former minister dilip parulekar expressed his sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.