राज्यातील २५ हजार युवक-युवतींना देणार उद्योगांना पूरक प्रशिक्षण: राजीव चंद्रशेखर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:34 AM2024-01-05T08:34:07+5:302024-01-05T08:35:34+5:30
तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे आणि बॅचेसचा मडगावातून शुभारंभ.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्यातील २५ हजार युवक-युवतींना वर्षभरात उद्योगांना पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भविष्यात प्रत्येक युवकाजवळ कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी जागतिक स्तरावरील कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मडगाव रवींद्र भवन येथे केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बोलत होते. यावेळी राज्यातील तीन विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्रे व बॅचेसचा शुभारंभ व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कौशल्य विकास केंद्रीय सचिव दीपक तिवारी व प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.
यावेळी राज्यातील कारागिरांचा गुरू सन्मान देऊन मंत्री चंद्रशेखर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना चंद्रशेखर म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्याचबरोबर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. काम करणाऱ्या प्रत्येक युवकाला शिक्षण व कौशल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या जागतिक पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था असून, लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र देशात सर्वप्रथम सुरू करण्याचा मान गोव्याला प्राप्त झाला आहे. १८ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ३२ कंपन्यांजवळ करार करण्यात आला आहे. यापुढे नोकरीसाठी पदवी शिक्षण, असे होणार नाही. पदवी शिक्षण घेताना आयटीआय प्रशिक्षणही घेता येईल. मात्र, यापुढे सरकारी नोकरीसाठी अप्रेंटीशीप असणे बंधनकारक असेल. किमान एक वर्ष कामाचा अनुभव असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही, ती शिपायाची असो व कारकुनाची असो, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
कारागिरांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण दिल्या नंतर टूल किट खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये व प्रशिक्षण खर्च अडीच हजार रुपये. त्यानंतर व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात नारीशक्ती, युवाशक्त्ती, किसानशक्त्ती व गरीब कल्याण या तत्त्वावर सरकारचे काम सुरू आहे. हर घर जल, हर घर फायबर, हर घर वीज, हर घर शौचालय व हर घर कौशल्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.