गोव्यात व्यावसायिक वाहनांवरील जाहिरातीवर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:25 PM2018-11-14T21:25:38+5:302018-11-14T21:27:17+5:30
टॅक्सी मीटर नसलेल्यांना मज्जाव; ७५ हजारापर्यंत शुल्क
पणजी: डिजिटल टॅक्सी मीटर व जीपीएस यंत्रणे न बसविणाऱ्या वाहनांवर जाहिराती लावण्यास मज्जाव करण्याचा आदेश वाहतूक खात्याने जारी केला आहे. टॅक्सी व्यावसायिकांना आपल्या वाहनात जाहिराती लावण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार वाहतूक खात्याच्या अधिकृत परवानगीशिवाय कोणताही टॅक्सी व्यावसायिक आपल्या वाहनात बाहेरच्या बाजूने किंवा आतच्या बाजूनेही जाहिरात लावू शकणार नाही. एकदा परवानगी घेतल्यास त्याची ग्राह्यता पाच वर्षांपर्यंत असेल. तसेच प्रत्येक पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागेल असे पत्रकात म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्य वाहतूक प्राधिकारणाची मान्यता असलेलेच डिजिटल मीटर आणि जीपीएस यंत्रणा बसविलेल्या टॅक्सींसाठीच ही परवानगी दिली जाणार आहे.
जाहिराती कोणत्या प्रकारच्या असाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या नसाव्यात याचेही निकष परिपत्रकात दिले आहेत. हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या, बदनामीकारक, जुगार दारू व तंबाखुची जाहिरात करण्यास सक्त मनाई आहे. केवळ १० टक्के जागाच जाहिरातीसाठी वापरता येणार आहे. या नियमांचा भंग केल्यास केंद्रीय परिवाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
केवळ निर्बंध लादून वाहतूक खाते थांबलेले नाही तर जाहीरातीसाठी परवानगी हवी असेल तर शुल्कही भरावे लागणार आहे. ते लहान वाहनासाठी आणि मोठ्या वाहनासाठी वेगवेगळ््या स्वरूपात आहे. मालवाहू वाहानांसाठी ते अथिक आहे. तसेच जाहिरातीच्या स्वरूपांनुसारही वेगवेगळे शुल्क ठरविण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी जाहिरातीला कमीत कमी एकरकमी शुल्क ५ हजार रुपये तर जास्तीत जास्त शुल्क ७५ हजार रुपये एवढे आहे.