गोव्यात नाताळ, नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'दृष्टी'ची ॲडव्हायझरी
By किशोर कुबल | Published: December 23, 2023 01:17 PM2023-12-23T13:17:09+5:302023-12-23T13:17:41+5:30
किनारपट्टीवर सावधान! नाताळ आणि नववर्षा दरम्यान कळंगुट सारख्या समुद्रांवर अधिक जीवरक्षक असणे गरजेचे आहे.
पणजी : नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी दृष्टी लाईफ सेविंग कंपनीने ॲडव्हायझरी जारी केली आहे. सुट्टीच्या या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे आहेत. किनारपट्टींवर समुद्रात पोहायला ते उतरतील तेव्हा बुडण्याच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून जीवरक्षकांची संख्या वाढवली आहे. जीवरक्षक २४ तास किनारपट्टींवर तैनात राहणार आहेत. दक्षिण गोव्यातील २७ समुद्रकिनारे आणि उत्तर गोव्यातील १८ किनारे तसेच दूधसागर आणि मयें तलावाच्या ठिकाणी बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे.
ॲडव्हायझरीमध्ये खालील सूचना केल्या आहेत.
- समुद्रकिनाऱ्याला भेट देणाऱ्यांनी वॉटरलाइनपासून किमान १० मीटर अंतर ठेवावे आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- मद्याच्या प्रभावाखाली असल्यास पाण्यात जाऊ नका.
- समुद्रकिनारी मुलांवर बारीक लक्ष ठेवा, पाण्यात जाऊ देऊ नका.
- किनार्यांवरील रेतीत काचेच्या तुकड्यांपासून सावध राहा, ज्यामुळे इजा होऊ शकते.
दरम्यान, मागच्या वर्षी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान एकूण १७१ बचावकार्ये गोव्याच्या किनाऱ्यांवर नोंदविण्यात आली होती. नाताळ आणि नववर्षा दरम्यान कळंगुट सारख्या समुद्रांवर अधिक जीवरक्षक असणे गरजेचे आहे. ' दृष्टी'ने बचाव कार्यासाठी 'औरस' आणि 'ट्रायटन' ही दोन कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मशीन तैनात ठेवली आहेत. त्या सोबत अनेक किनारपट्टींवर साइन बोर्ड, सर्फबोर्ड, रेस्क्यू बोर्ड, रेस्क्यू ट्यूब, हॅंडहेल्ड रेडियो सेट आणि बॅग व्हेल्व मास्क ठेवले आहेत.
दक्षिण गोव्यात बायणा, बोगमाळो, वेळसांव, होळांत, आरोसी, माजोर्डा, उतोर्डा, बेतालभाटी, कोलवा, बाणावली, वार्का, झालोर, सेर्नाभाटी, केळशी, मोबोर, आगोंदा, बेतुल, खणगीणी, काब द राम, पाळोळें, खोला , पाटणे, राजबाग, तळपण, गलजीबाग आणि पोळें किनारी भागात तसेच उत्तर गोव्यात केरी, कोको बीच, हरमल, आश्वे- मांद्रे, मोरजी, वागातोर, हणजूण, बागा,कळंगुट, कांदोळी सिकेरी, मिरामार, दोनापावला, शिरदोण किनारे तसेच दुधसागर धबधबा व आणि मयें तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.