देवबाग-काणकोणमध्ये डॅनियलीच्या स्मृतींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 04:15 PM2019-03-14T16:15:13+5:302019-03-14T16:16:46+5:30
दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या स्मृतीला बुधवारी देवबाग-काणकोण येथे तिच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली.
मडगाव - दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या स्मृतीला बुधवारी देवबाग-काणकोण येथे तिच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रार्थना करण्यात आल्या. मृत डॅनियलीच्या आत्म्याला शांती मिळण्याबरोबरच तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दोन वर्षापूर्वी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवबाग-काणकोण येथे होळीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या डॅनियलीची 14 मार्च 2017 रोजी हत्या झाली होती. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कारही झाल्याचे उघडकीस आले होते. या हत्या प्रकरणाकडे आंतरराष्ट्रीय मीडियाने आपले लक्ष वेधल्याने पूर्ण जगात ही हत्या गाजली होती. नंतर या प्रकरणात विकट भगत या स्थानिक युवकाला अटक करण्यात आली होती. सध्या या हत्या प्रकरणाची सुनावणी मडगावच्या दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात चालू आहे.
ज्या ठिकाणी डॅनियलीचा मृतदेह सापडला होता त्याच ठिकाणी डॅनियलीच्या मित्रांनी दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जमून गाणी म्हणून संगीताच्या तालावर तिला श्रद्धांजली वाहिली. यावेळी विदेशी पर्यटकांबरोबरच स्थानिकही लोक उपस्थित होते. अशाच प्रकारची प्रार्थना डॅनियलीच्या मायदेशी म्हणजे आर्यलडच्या डोनेगल या प्रांतातील कॉकहिल चॅपलमध्ये केली जाईल अशी माहिती डॅनियलीची जवळची मैत्रिण मेरी हिने दिली.
डॅनियलीची आई एड्रिया ब्रेनिगन यांनीही सोशल मीडियावरुन सर्वांचे आभार मानताना आतापर्यंत मिळत असलेल्या पाठिंब्यामुळेच आपण डॅनियली विरोधातील हा लढा चालवू शकले असे तिने आपल्या संदेशात म्हटले आहे. या घटनेनंतर आयरीश सरकारनेही अशाप्रकारे विदेशात अत्याचार झालेल्या आयरीश नागरिकांना आर्थिक मदत देण्याची तरतूद कायद्यात केल्यामुळे सरकारचेही आभार मानले. विदेशात अत्याचार होणाऱ्या आयरीश नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आपण सुरू केलेले मिशन चालूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.