अखेर खेळ हरला, 'वाद' जिंकला; क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केली परखड भूमिका
By समीर नाईक | Published: October 25, 2023 03:46 PM2023-10-25T15:46:15+5:302023-10-25T15:49:21+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला एकूण ४३ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
पणजी : ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉल क्रीडा प्रकार अखेर वगळविण्यात आला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर राज्यातील दोन व्हॉलीबॉल संघटनांचा वाद चव्हाट्यावर आला होता, केंद्रापर्यंत हा वाद पोहचला होता, कुणीही मागे घेण्यास तयार नसल्याने या स्पर्धेतून व्हॉलीबॉलला वगळविण्यात आले. अखेर वाद जिंकला आणि खेळ हरला .
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला एकूण ४३ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात जास्त क्रीडा प्रकार असणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा गाजावाजा होत होता, पण जशी जशी स्पर्धा सुरू झाली, तसे संघटनेमधील वाद उफाळू लागले आहे. व्हॉलीबॉल बाहेर पडला आहे, आता हँडबॉल देखील याच मार्गावर आहे.
व्हॉलीबॉल नंतर हँडबॉल क्रीडा प्रकार स्पर्धेत असणार आहे की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हँडबॉल खेळ देखील दोन संघटनेच्या वादात सापडला आहे. सध्या न्यायालय हे प्रकरण पोहचले आहे. स्क्वे मार्शल आर्ट बाबत देखील हेच सुरू आहे. महत्वाचे म्हणजे राज्य सरकार व इतर यंत्रणा यामध्ये काहीच करू शकत नाही. तेही संघटनेनंच्या या गोंधळात हतबल आहेत.
एकाच खेळाची राज्यात दोन संघटना आहेत, काही जण फक्त पदे मिळविण्यासाठी संघटना तयार करत आहेत, यातून असे वाद होत आहे. यातून खेळाडूंचे भवितव्य अंधारात येत आहे. आताच्या क्षणाला राज्य सरकार किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटना काहीच करू शकत नाही, त्यामुळे जसे सुरू आहे, तसेच सुरू राहणार आहे. पण ही स्पर्धा झाल्यानंतर निश्चितच यावर मी खास बिल अस्तित्वात आणणार आहे. आणि अशाप्रकारच्या कुठल्याही गोष्टी खपवून घेतले जाणार नाही.
- गोविंद गावडे, क्रीडामंत्री