मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:07 PM2018-11-23T12:07:09+5:302018-11-23T12:07:12+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे. रोहन खंवटे, विजय सरदेसाई, विश्वजित राणे यांचे सचिवालय तथा मंत्रालयात येणे आता खूपच कमी झाले आहे. किंबहुना ते येतच नाहीत.
मंत्री खंवटे यांनी आपण प्रशासन ठप्प झाल्याचा व फाईल्स अधिकारी मंजूर करत नसल्याचा निषेध म्हणून मंत्रालयात येत नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र कृषी मंत्री विजय सरदेसाई हे देखील मंत्रालयात येतच नाहीत. सरदेसाई हे पूर्वी महिनाभर सचिवालय तथा मंत्रालयात आलेच नव्हते. चतुर्थीच्या काळात ते पुन्हा आले होते. पण नंतर त्यांनी मंत्रालयात येणे बंद केले. राज्य नियोजन मंडळाची बैठक घेण्यासाठी एकदा ते सचिवालयात आले होते. पत्रकारांनी नुकतेच मंत्री सरदेसाई यांना खंवटे यांच्याविषयी विचारले तेव्हा आम्ही तरी सचिवालयात कुठे येतो असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अर्थात सरदेसाई यांनी मात्र कसलाच निषेध केलेला नाही ते सचिवालयात जास्त काम नसल्याने जास्त येत नाहीत.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पूर्वी दर बुधवारी सचिवालयात येत होते. कारण बुधवारी मंत्रिमंडळ बैठका व्हायच्या. तथापि, आता मुख्यमंत्रीही सचिवालयात पोहोचत नसल्याने आणि मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नसल्याने मंत्री राणे यांनीही सचिवालयात येणे थांबविले आहे. ते मिरामार येथील त्यांच्या निवासस्थानातून सगळे सरकारी काम करतात. सर्व फाईल्स तिथेच जातात व अधिका-यांच्या बैठकाही तिथेच होतात.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर व कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे नियमितपणो सचिवालयात जातात. यापैकी मंत्री साळगावकर हे न चुकता मंत्रलयात जात असतात.
दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कोअर टीमच्या सदस्यांनी नुकतीच महसूल मंत्री खंवटे यांची भेट घेतली व त्यांनी निषेध का पुकारला आहे हे जाणून घेतले. प्रशासन ठप्प झालेले असल्याचे खंवटे यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितले. मंत्र्यांना ज्या बदल्या हव्या असतात त्या देखील होत नाहीत हे खंवटे यांनी भाजपामसोर मांडले आहे.