मुख्यमंत्र्यांच्या तोडग्यानंतर टूर ऑपरेटर्सचे आंदोलन मागे; जीटीडीसीचे काऊंटर कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 08:34 AM2024-11-03T08:34:02+5:302024-11-03T08:35:09+5:30
दरवाढ दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय; जीटीडीसी, जीएफडीसी व ऑपरेटर्स यांच्यात होणार करार
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : दुधसागर धबधब्याच्या पर्यटनावरुन निर्माण झालेला तिढा मुख्यमंत्र्यांच्या तोडग्यानंतर सुटलेला आहे. शनिवारी साखळी रवींद्र भवनात दूधसागर जीप ऑपरेटर्स असोसिएशनचे सदस्य व मुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यानंतर ऑपरेटर्सनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय समजून घेत विविध पर्याय असोसिएशन समोर ठेवले. त्यात जीटीडीसीचे काऊंटर कायम राहणार, ऑनलाइन बुकींगही चालूच राहणार, असे सांगितले. तसेच पैसे कमी करण्याच्या मागणीवर तोडगा काढत २०० कमी करण्यात आले. तसेच या सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला असून हा तोडगा जीप ऑपरेटर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मान्य केला आहे. उद्यापासून काम सुरू करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप व सचिव नंदेश देसाई यांनी सांगितले.
जीप असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया करून घेतल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन सव्हिस प्रोव्हायडर नेमण्यात येणार आहे. तसेच गोवा वन विकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ व असोसिएशन ) यांच्यात करार करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरळीत होणार आहे. या विषयावर आता तोडगा काढण्याचे आश्वासन स्वतः असोसिएशनने दिले असून बैठकीत चर्चेत आलेल्या विषयांनुसार सेवा चालणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
या बैठकीस दूधसागर जीप ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप, धारबांदोडा सरपंच विनायक गावस, भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई, मंडळ सचिव मच्छिंद्र देसाई, सचिव नंदेश नाईक देसाई, मयुर मराठे उपाध्यक्ष, खजिनदार कौशिक खांडेपारकर, दिलीप मायरेकर, ट्रिबोलो सौझा, ब्रिजेश भगत, बेनी आजावेदो, जॉन फर्नाडीस व इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, सचिव नंदेश देसाई मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर आम्ही पुढे आगार असल्याचे सांगितले.
एक महिन्याचा कालावधी
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांवर व आमदारांवर विश्वास ठेऊन सर्वांना सांगून चर्चा केल्यानंतर एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या एका महिन्यात सर्व काही सुरळीत केले जाणार आहे. जीटीडीसीचे काऊंटर तसाच राहणार आहे. जिटीडीसी, जीएफडीसी व असोसिएशन यांच्याशी संयुक्तपणे करार केला जाणार आहे.
आंदोलनस्थळी तोडग्यावर चर्चा
या विषयावर असोसिएशनने दोन दिवसांचे साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा एक दिवस झालेला आहे. उद्या सकाळी ८ वाजता आम्ही सर्वजण जमणार व तिथे येणाऱ्या लोकांना बैठकीतील तोडग्याबाबत सांगण्यात येणार आहे. उपोषणाबाबत आपण एकटा निर्णय घेऊ शकत नाही. सर्वांसमोर हा विषय मांडणार व मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेऊनच पुढील निर्णय होणार, असे अध्यक्ष निलेश वेळीप यांनी सांगितले.