चार दशकांनंतर ‘ती’चे घर झाले प्रकाशमान; घरास वीज कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:10 PM2023-02-15T14:10:27+5:302023-02-15T14:11:13+5:30
एकाकी ज्येष्ठ नागरिक ६५ वर्षीय महिलेच्या घरात ४० वर्षांनी वीज कनेक्शन मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, खांडेपार: नंदन केरये खांडेपार येथील देवकी काशीनाथ गावडे या एकाकी ज्येष्ठ नागरिक ६५ वर्षीय महिलेच्या घरात ४० वर्षांनी वीज कनेक्शन मिळाले. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाखाली नियुक्त करण्यात आलेले स्वयंपूर्ण मित्र तिच्यासाठी खरे देवदूत ठरले. त्यांच्या घराचे विद्युतीकरण करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांमार्फत आवश्यक ती सर्व मदत देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चमक दिसली.
ज्येष्ठ नागरिक देवकी काशीनाथ गावडे यांनी तिरुपती येथे देवदर्शनासाठी जाण्याची इच्छा दर्शविली. मूलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर गेल्या ४० वर्षांपासून घरात एकटीच राहत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत दरमहा रुपये २००० ची आर्थिक मदत मिळते ज्यातून ती आपला उदरनिर्वाह करते. स्वयंपूर्ण मित्राशी संवाद साधताना त्यांनी दिवसा घरात राहणे आणि रात्र झाली की वीज कनेक्शन नसल्यामुळे आपल्या दिराच्या घरी जाते, असे तिने सांगितले. त्यानुसार स्वयंपूर्ण मित्र सुदेश गावडे यांनी देवकी यांना प्रकाश दिसावा याची पूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी वीजजोडणी घेण्यासाठी पंचायतीकडून एनओसी मिळविण्यासाठी फॉर्म भरून नितेश नाईक, एमटीएस यांना पाठवून सर्व औपचारिकता योग्यरीत्या पूर्ण केल्याची खात्री केली.
पंचायतीकडून एनओसी मिळाल्यानंतर आणि स्वयंपूर्ण मित्राकडून संबंधित कार्यालयाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर देवकी काशीनाथ गावडे यांना ७ फेब्रुवारी २०२३ रोजी वीज कनेक्शन देण्यात आले. सहायक लाइनमन संजय गावडे, रूपेश गावडे आणि सत्यवान सतरकर यांनी वीजजोडणीची सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. ४० वर्षांनंतर घरी विजेचे कनेक्शन पाहून खूप आनंद झाला असे त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित बोलले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"