पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री कोण?, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 03:09 PM2018-10-18T15:09:06+5:302018-10-18T15:09:44+5:30
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली.
पणजी : मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली. विनय तेंडुलकर, प्रमोद सावंत, विश्वजित राणे यांची नावे प्रामुख्याने भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेस आली. शहा हे गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषी मंत्री सरदेसाई, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना स्वतंत्रपणे भेटले. सभापती प्रमोद सावंत हेही दिल्लीत दाखल झाले आहेत.
पर्रीकर आजारी असल्याने सरकारसाठी नवा नेता शोधावाच लागेल. त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून शहा यांनी सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. स्वत: सरदेसाई यांनी दिल्लीतील बैठकीनंतर लोकमतशी बोलताना वृत्ताला दुजोरा दिला. भाजपप्रणीत आघाडी सरकार गोव्यात कायम राहायला हवे व ते राहीलच, अशी ग्वाही शहा यांनी आपल्याला दिली. गोवा सरकारच्या स्थिरतेची हमी शहा यांनी आपल्याला दिली. भावी मुख्यमंत्री म्हणून काही नावांविषयी शहा यांनी माझ्याशी चर्चा केली. ती नावे मी उघड करू शकत नाही. मात्र गोवा सरकारच्या नेतृत्वाचा विषय शहा यांनी गंभीरपणे घेतला आहे. ते योग्य तो उपाय काढतील. सरकार कालावधी पूर्ण करील, असे मंत्री सरदेसाई म्हणाले.
गोमंतकीयांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत काय अपेक्षा आहेत हे मी शहा यांना सांगितल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विश्वजित यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हेही आहेत. त्यांचेही नाव चर्चेत आले. सभापती सावंत हे साखळी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचेही नाव शहा व मंत्री सरदेसाई यांच्यातील चर्चेवेळी चर्चेस आले. मंत्री विश्वजित यांच्याविषयीही शहा यांनी चर्चा केली. निर्णय कोणताच झालेला नाही. प्रमोद सावंत यांना तातडीने मुख्यमंत्री पर्रीकर यांनीच गोव्याहून दिल्लीला पाठवले असल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटात बोलले जात आहे.