श्रीलंका बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील किनारपट्टीवरील सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:04 PM2019-04-25T16:04:35+5:302019-04-25T16:07:23+5:30
श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर गोव्यातील किनारपट्टीवर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही अधिक असते अशा किनाऱ्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे.
मडगाव - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी (21 एप्रिल) ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर गोव्यातील किनारपट्टीवर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही अधिक असते अशा किनाऱ्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. त्याशिवाय हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची कसून चौकशी करावी असे निर्देश हॉटेल व्यावसायिकांना देखील देण्यात आले आहेत.
दक्षिण गोव्यातील वास्कोपासून काणकोणर्पयत ही गस्त चालू आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेले कोलवा समुद्र किनाऱ्यापासून माजोर्ड्यापर्यंत तसेच वार्का ते केळशी-मोबोर्पयत कोलवा पोलिसांकडून गस्त घातली जाते. तर काणकोण पोलिसांनी पाळोळे व इतर समुद्र किनाऱ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. वेर्णा पोलिसांनीही आपल्या कक्षेत येणाऱ्या किनारपट्टीवर गस्त सुरू केली आहे. मोटर सायकलवरुन पोलीस किनारपट्टीवर गस्त घालत असून हा पर्यटन मौसम संपेपर्यंत ही गस्त चालू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पोलिसांनी लक्झरी हॉटेल्सवरही आपले लक्ष केंद्रीत केले असून हॉटेल्सनी आपली सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क करावी असे त्यांना सुचविण्यात आले आहे. प्रत्येक पर्यटकांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा अशा सूचना तारांकित हॉटेल्सना देण्यात आल्या आहेत. कुठलीही संशयास्पद गोष्ट सापडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
गोव्यात चर्चची सुरक्षा व्यवस्था वाढविली
कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर पोलीस महासंचालकांशी आपण बोललो असून आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘खबरदारीच उपाययोजना म्हणून चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षेबाबत मी आढावा घेतलेला आहे. आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्याशीही चर्चा करुन आणखी काय करणे आवश्यक आहे हे पाहू.’ चर्चच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात जुने गोवे येथे सेंट झेवियरचे बॉ जिझस बासिलिका चर्च तसेच अन्य महत्त्चाची चर्च आहेत. राज्यातील ख्रिस्ती लोकसंख्या सुमारे 27 टक्के आहे.