विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:05 PM2018-09-29T22:05:44+5:302018-09-29T22:06:49+5:30

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

after three and a half years the assembly elections ; BJP claims | विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

Next

पणजी : गोवा विधानसभा निवडणुका येत्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा मुळीच विचार नाही. विद्यमान सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. येत्या साडेतीन वर्षानंतरच मग विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.


भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पर्वरी येथे पार पडली. त्यानंतर तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पणजीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप कार्यकर्त्यांमधील व काही आमदारांमधील असंतोषाविषयी पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले, की कार्यकर्त्यांना आपण भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकले व मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय त्यांना पटवून दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील वाद आता मिटला. लोकसभा निवडणुकीवर गोव्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. 


मुख्यमंत्री पर्रीकर व आमदार पांडुरंग मडकईकर हे कधी परत येतील, असे पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले की पर्रीकर परत येतील पण ते केव्हा येतील याची कल्पना नाही. मडकईकर यांची प्रकृती सुधारली आहे पण ते लगेच चालत रोज सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी निलेश काब्राल यांच्याकडे वीज खाते सोपवावे लागले. काब्राल यांना मंत्री करावे लागले. वीजेचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतात. काब्राल ते काम करतील. फोंडय़ातील वादळानंतरही त्यांनी जलदगतीने काम केले. मडकईकरांचे आरोग्य पूर्ण सुधारल्यानंतर व ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. 


भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती राज्य कार्यकारिणी बैठकीत देण्यात आली. महात्मा गांधी जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने भाजपकडून देशभर येत्या दि. 2 ऑक्टोबरपासून दि. 3 जानेवारीपर्यंत पदयात्रा काढली जाईल. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व त्यांचा वारसा सर्वत्र पोहचविला जाईल. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गोव्यात पक्षाचे काम वाढविणे, बूथस्तरापासून संघटना मजबूत करणे हे सगळे सुरू आहे, असे खासदार सावईकर यांनी सांगितले.


दोन तासांत बैठक आटोपली
दरम्यान, भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक ही पूर्वी एक दिवसाची होत असे. नंतर ती अर्ध्या दिवसाची होऊ लागली. शनिवारी फक्त दोन तासांत कार्यकारिणी बैठक आटोपली. प्रत्येक राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेऊन सरकारने केलेल्या प्रगतीविषयी अभिनंदन करण्याचा ठराव संमत करून घेतला जात असे. मात्र, शनिवारच्या बैठकीत तसा कोणताच ठराव घेतला गेला नाही, असे बैठकीस उपस्थित राहिलेल्या काही सदस्यांनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना एनआयटीने डिलीट पदवी दिल्यामुळे पर्रीकर यांचे अभिनंदन करणारा ठराव तेवढा घेतला गेला. तसेच सर्जिकल स्ट्राईकविषयी पंतप्रधानांच्या निर्णयाचे अभिनंदन केले गेले.  

Web Title: after three and a half years the assembly elections ; BJP claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.