दुपारी ३ वाजताचे विमान सुटले रात्री पावणे ११ ला; मुंबईतून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड आबाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:13 AM2023-11-30T11:13:33+5:302023-11-30T11:15:19+5:30
थंड बिर्याणी अन् पिशवीतून रायता, उड्डाणाऐवजी झाली फरफट...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/पणजी : मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईहून गोव्याला निघणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या एका विमानाने प्रत्यक्ष उड्डाण केले रात्री पावणे अकराला. त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून विमानतळावर आलेले प्रवासी मोपा विमानतळावर पोहोचले साडे अकरा वाजता. विमानतळाबाहेर येईपर्यंत मध्यरात्रीचे १२ वाजलेले, तर आपल्या घरी पोहोचायला मध्यरात्रींनंतरचा एक वाजून गेला. त्यामुळे प्रवासी या विमान कंपनीच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त करीत होते.
भावनगर, कोच्ची विमान सेवेतही गोंधळ होता आणि चेन्नईला दुपारी ४ वा. निघणारे विमान रात्री ११:३० वाजता सुटेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या विमान कंपनीमधून यापुढे प्रवास नकोच, अशी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
थंड बिर्याणी अन् पिशवीतून रायता
सहा- सात तास खोळंबून असलेल्या प्रवाशांना बिर्याणी देण्यात आली. मात्र, ती थंड होती. प्लास्टिकच्या पातळ पिशवीत रायता हे जेवण देण्यात आले. रात्री नऊ वाजता सुटणाऱ्या विमानात पावणेदहानंतर नेण्यात आले. तिथे आता पंधरा मिनिटांत विमान उड्डाण करेल, अशी घोषणा पायलटने केली. नेमकी ती हवाई वाहतुकीची गर्दीची वेळ होती. त्यामुळे विमानाने उड्डाण पावणे अकरा वाजता करण्यात आले.
उड्डाणाऐवजी झाली फरफट...
- छत्रपती शिवाजी महाराज (सांताकूझ) विमानतळावरून गोव्यासाठीचे विमान तीन वाजून पाच मिनिटांनी सुटते. त्यासाठी प्रवासी दोन तास आधी म्हणजे एक वाजता पोहोचले. चेकिंग आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना साडेतीन वाजता विमानात पाठवणे सुरू केले.
- प्रवासी स्थानापन्न झाले; पण विमानोड्डाण होण्यास विलंब होत होता. दोन्ही दरवाजे उघडे ठेवल्याने प्रवाशांना प्रचंड उष्मा जाणवत होता. प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने घोषणा झाली. विमानात बिघाड असल्याने विमान थोड्या वेळाने उड्डाण करेल. त्यानंतर प्रवाशांना पाणी द्यायला सुरुवात झाली.
- पावणेपाच वाजता हे विमान उड्डाण करणारच नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे सर्व प्रवाशांना उतरवून आगमन कक्षात आणले. बराच वेळ तिथे माहिती द्यायला कोणीच नव्हते. तेथून पुन्हा प्रस्थान भागात कसे जायचे, बोर्डिंग पास हाच चालेल की, पुन्हा वेगळा घ्यायचा, हे कळत नव्हते. त्यामुळे प्रवाशांत गोंधळ निर्माण झाला.
- थोड्या वेळाने त्या विमान कंपनीची एक कर्मचारी आली. प्रस्थान भागात जा आणि बोर्डिंग पास बदलून घ्या, असे ती म्हणाली. दुसरे विमान रात्री नऊ वाजता सुटेल, तोपर्यंत बसून राहा, प्रवास रद्द करायचा असल्यास पैसे परत करू, असे ती उपकारकर्त्याच्या पद्धतीने सांगत होती. विमानाला विलंब होणार असल्याने खाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही सांगितले.