अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक
By वासुदेव.पागी | Published: September 30, 2023 08:10 PM2023-09-30T20:10:24+5:302023-09-30T20:10:55+5:30
सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता.
पणजी: अमेरिकन लोकांना गंडविणाऱ्या आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पणजी पोलिसांनी पर्दाफााश केला असून या कॉल सेंटरमधून अँमेझोन, एप्पल आणि मायक्रोसॉफ्टच्या उत्पादनांना टेक्नीकल सपोर्ट देणारे केंद्र असल्याचा बनाव करून ही फसवणूक करण्यात आली.
सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता. अमेरिकेतील लोकांना मोबाईल ॲपच्या आधारे इंटरनेट कॉल करून फसवणूक सुरू होती. कधी मायक्रोसॉफ्ट उत्पादनांसाठी एन्टीव्हायरस देण्याचे सांगून तर कधी अमेझोन सेवा तर कधी ॲप्पल उत्पादनासाठी सेवा देण्याचा बनाव चालला होता. त्यासाठी शुल्काची रक्कम ऑनलाईन भरण्यास ते सांगत होते. ती रक्कम गीफ्ट वाऊचरद्वारे फेडण्यास सांगत होते. लोकांनी त्यांच्यावर भरवसा ठेऊन सांगितलेली रक्कम गीफ्ट वाउचरद्वारे फेडली. असे करून लाखो रुपयांची कमाई या लोकांनी केली.
या प्रकरणात अनेक तक्रारी अमेरिकेत नोंद झाल्या होत्या. याची माहिती गोवा पोलिसांना मिळाल्यानंतर या बोगस कॉलसेंटरचा छडा लावण्यात आला. पणजी पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे कॉलसेंटरवाल्यांचा गोंधळ उडाला. त्या कॉलसेंटरमध्ये असलेल्या १३ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. तपन शहा, जयमीन मिस्त्री,मिलिंद गांधी, विशाल भाई, संदीप सिंग, प्रियंका शक्या, कुणाल नानकु, लंम्सेपी संघा, एलन मेथ्यु, राजीव राणा, राजु बर्मन, देवे शिवम, कबीर सिंग या १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर या १३ जणांसह काजोल सुवर्णा, मिहीर नाथ, पिउथ्रुशम प्रजापती १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले आला आहे.
अटक करण्यात आलेले आणि गुन्हा नोंदविण्यात आलेले सर्व संशयित गुजरात, नागालँड, महाराष्ट्र आणि उत्तराखंड येथील आहेत. रोख रक्कम, तसेच संगणक, मोबाईल, लॅपटॉप, राउटर व इतरसाहित्य मिळून २६.४३ लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.