गोव्यात घराणेशाहीला पुन्हा झिडकारले
By admin | Published: March 12, 2017 02:23 PM2017-03-12T14:23:33+5:302017-03-12T14:23:33+5:30
गोव्यातील निवडणूक निकालाने सर्व राजकीय पक्षांनी बरेच काही शिकण्याचे आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12 - गोव्यातील निवडणूक निकालाने सर्व राजकीय पक्षांनी बरेच काही शिकण्याचे आहे. जनतेने जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिलेली असली तरी घराणेशाहीला थारा दिलेला नाही. सत्तरीतील राणे पितापुत्रांचा जुनाच अपवाद वगळता एकाही कुटुंबातील दोन व्यक्तींना पुन्हा स्थान दिलेले नाही.
घराणेशाहीच्या नादामुळे २०१२ साली काँग्रेसला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले होते. त्यातून फारसा बोध काँग्रेसने घेतलेला नाही. एवढे सारे महाभारत होऊनही सांगे मतदारसंघात काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाच उमेदवारी देऊन घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली.
सत्तरीत प्रतापसिंग राणे आणि विश्वजित राणे या पितापुत्रांना दिलेल्या उमेदवाऱ्या या त्यांचे या भागात असलेल्या निर्विवाद प्रभुत्वामुळे दिल्यानं समजण्यासारखे आहे. परंतु सांगेतील उमेदवारी ही लोकांच्या पचनी पडण्यासारखी मुळीच नव्हती आणि त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागले. ताळगावमध्ये जेनीफर मोन्सेरात या काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या असल्या तरी काँग्रेसने समर्थन दिलेले त्यांचे पती बाबूश मोन्सेरात पणजीत हरले. मोन्सेरात कुटुंबीयांचे राजकीय अस्तित्व अर्धे कमी झाल्याचे हे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले चर्चिल आलेमाव बाणावलीत पुन्हा निवडून आले आहेत. त्यांचे बंधू ज्योकीम आलेमाव मात्र कुंकळ्ळी मतदारसंघात हरले आहेत. ज्योकीम यांनी अपक्ष जरी उमेदवारी दाखल केली असली तरी एका कुटुंबातील दोन उमेदवार जनतेने नाकारले. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात इच्छुक होते. त्या मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले पांडुरंग मडकईकर हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. म्हणजेच त्या मतदारसंघात सिद्धेश नाईक यांनी निवडणूक लढविली असती तर ते कितपत बाजी मारू शकले असते हे आता स्प्ष्टच झाले आहे.
घराणेशाहीला झिडकारणाऱ्या या निकालांतून सर्वच राजकीय पक्षांनी धडा घेण्यासारखी ही परिस्थिती आहे. यापुढे पक्षाच्या उमेदवाऱ्या या घरच्या घरी वाटून घेतल्या तर काय परिणाम होऊ शकते, याची झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे. राजकीय पक्ष जेव्हा शिस्तीची बंधने स्वत:वर घालून शकत नाहीत तेव्हा जनता ती सूत्रे स्वत:कडे घेते हेच त्यावरून सिद्ध होत आहे.