सनबर्नविरोधात पेडणे पेटले; आर्लेकरांचे 'बंड', लोकांनीही थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2024 12:14 PM2024-12-02T12:14:17+5:302024-12-02T12:14:17+5:30

सरकारच्या वृत्तीचा निषेध; समर्थन करणाऱ्यांना थेट इशारा; धारगळमध्ये आजही बैठक

against sunburn mla arlekar rebellion | सनबर्नविरोधात पेडणे पेटले; आर्लेकरांचे 'बंड', लोकांनीही थोपटले दंड

सनबर्नविरोधात पेडणे पेटले; आर्लेकरांचे 'बंड', लोकांनीही थोपटले दंड

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे /मोपा: धारगळ येथेच सनबर्न महोत्सव होणार असल्याचे सांगत सरकारने मान्यता देऊन २४ तास उलटण्याच्या आतच पेडणे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी सनबर्नविरोधात धारगळ येथे लोकांनी एकत्र येत थेट सरकारलाच इशारा दिला. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लोकांसोबत सहभागी होत सनबर्नविरोधात दंड थोपटल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

धारगळ येथे जाहीरसभेत बोलताना आमदार आर्लेकर यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत घरचा आहेर दिला. संतापाच्या सुरात ते म्हणाले की, सत्तेत असूनही प्रत्येकवेळी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. धारगळमध्ये सनबर्न आयोजित करण्याचा निर्णयही मला अंधारात ठेवून घेण्यात आला आहे. लोकांना हा महोत्सव नको असल्यामुळे याप्रश्नी मी लोकांसोबतच असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे सनबर्नला पाठिंबा देण्यासाठी धारगळ पंचायतीचा सत्तारूढ गट व टॅक्सी व्यावसायिकांचीही एक जाहीरसभा कामाक्षी सभागृहात झाली. त्यामुळे धारगळ येथे सनबर्न सुरु होण्याअगोदरच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. सनबर्नवरून सध्या दोन गट तयार झाले आहेत. यात आमदार आर्लेकर यांनी सनबर्नला विरोध करत थेट सरकारलाच इशारा दिला आहे.

दरम्यान, धारगळ येथील सभेला मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, मांद्रेचे माजी सरपंच अॅड. अमित सावंत, धारगळचे पंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, अनिकेत साळगावकर, माजी सरपंच बाळा ऊर्फ प्रशांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, रामा वारंग, शंकर पोळजी, भास्कर नारुलकर, अॅड. जितेंद्र गावकर, माजी सरपंच गौरी जोशलकर, माजी सरपंच अनिकेत साळगावकर, देवेंद्र देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, रमेश सावळ, कृष्णा नाईक, सरपंच अशोक धाऊसकर, अॅड. प्रसाद शहापूरकर, बबन नाईक, आपचे पुंडलिक धारगळकर, भारत बागकर, तोरसेच्या सरपंचा छाया शेट्ये, अश्वेश नाईक, सुरेश कारापूरकर, प्रीतेश कानोळकर, मोपा सरपंच सुबोध महाले, उपसरपंच रमेश बुटे, माजी सरपंच उत्तम वीर, विजय तोरस्कर, विजय मोपकर, काशीनाथ पेडणेकर उपस्थित होते.

पंचायत कार्यालयात घुसून काय ते दाखवीन

रौद्रावतार धारण केलेले आर्लेकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी धारगळ पंचायती मंडळासही खडेबोल सुनावले आहेत. धारगळमध्ये मी हा महोत्सव होऊ देणार नाही. आज, सोमवारी या महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात धारगळ पंचायतीत बैठक होणार आहे. या बैठकीत पंचायत मंडळाने परवानगी दिल्यास आत घुसून आपण काय ते दाखवून देऊ, असा तडक इशाराच आर्लेकर यांनी दिला आहे.

सत्तारुढ गैरहजर 

या सभेला भूषण नाईक वगळता सत्तारूढ गटाचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य उपस्थित नसल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पंचायतीत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

लोकांना एकत्र येण्यास बंदी 

लोकांचा विरोध डालवून धारगळ येथे सनबर्नच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी आज धारगळ पंचायत मंडळाची पाक्षिक बैठक होणार आहे. परंतु नेमके याच पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांनी विशेष आदेश जारी करून लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. या नोटिशीमुळे धारगळमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पेडणे पोलिसांनी आदेशात म्हटले आहे की, धारगळ येथे सनबर्न होणार आहे. या महोत्सवाला विरोध करण्यासाठी काहीजण बेकायदेशीर कारवाया करण्याची शक्यता आहे. लोकांनी अशा कारवायांमध्ये सहभागी होऊन कायद्याचे उल्लंघन करू नये, असेही नोटिशीत म्हटले आहे. भारतीय नागरी संहिता कलम २६८ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.

मला विश्वासात न घेता हा निर्णय सरकारने माझ्या मतदारसंघात सनबर्न आयोजनाचा निर्णय घेतलाच कसा? मी सुरुवातीपासून या महोत्सवाला विरोध करत आहे. धारगळ पंचायत मंडळांने पेडणे तालुक्यातील जनतेच्या भावनांचा विचार करून परवानगी नाकारावी. - प्रवीण आर्लेकर, आमदार
 

Web Title: against sunburn mla arlekar rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.