दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 11:10 AM2024-05-09T11:10:07+5:302024-05-09T11:11:45+5:30
श्रीपाद नाईक १ लाख तर पल्लवी ६० हजार मतांनी जिंकणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळेल व ते एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, तसेच दक्षिणेत केवळ ६ मतदारसंघांत थोडेसे मागे असलो तरी सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई व सांगे या मतदारसंघांमध्ये मोठे मताधिक्य भाजपला मिळेल. पल्लवी धेपे ६० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोबत राज्यसभा खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते. संपूर्ण गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व आता केवळ चार विधानसभा मतदारसंघांपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. काँग्रेसने यावेळी प्रचारात केवळ जाती, धर्माचे राजकारण केले. भाजप नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो. त्यांच्याकडे सांगण्यासारखा एकही मुद्दा नव्हता. गोव्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मतदान केंद्रांबाहेर काँग्रेसच्या टेबलांवर माणसेच नव्हती. त्यांची दयनीय स्थिती होती. आमच्या उमेदवारांचा केवळ अपप्रचार त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर आरोप केले. गोव्यातील जनतेने त्यांना साथ न देता भाजपला मतदान केले. भाजप आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी निःस्वार्थ भावनेने काम केले. यावेळी श्रीपाद नाईक यांनी मतदारांचे आभार मानले. आमदार, मंत्री, पंच, सरपंच यांनी स्वतःची निवडणूक असल्याप्रमाणेच काम केले. मुख्यमंत्र्यांनीही रोज २२ तास काम केले. प्रचंड उष्मा असतानाही लोक मतदानासाठी घराबाहेर पडले. या सर्वांचे मी आभार मानतो.
ही शेवटची निवडणूक?
पत्रकारांनी श्रीपाद यांनी ही आपली शेवटची निवडणूक असेल, असे जे पूर्वी विधान केले होते त्याची आठवण करून दिली. त्यावर श्रीपाद म्हणाले की, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. मी माझी भूमिका सांगितली असली तरी पक्ष जो काही आदेश देईल तो मला शिरसावंद्य राहील.
काँग्रेसचे अस्तित्व केवळ चार मतदारसंघांपुरते
मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील इंडिया आघाडीतील घटकांवर टीका केली. काँग्रेसचे अस्तित्व आता चार विधानसभा मतदारसंघांपुरतेच सीमित राहिलेले आहे, असे ते म्हणाले. मतदानाच्या दिवशी इंडिया आघाडीतील काही जण स्वतः काँग्रेसचेच नेते असल्याप्रमाणे भांडत होते. गोव्यात काँग्रेस आता कोण टेक ओव्हर करील सांगता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
पन्ना प्रमुखांचे मोठे योगदान : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सत्तरी व डिचोली तालुक्यात झालेल्या विक्रमी मतदानाचा हवाला देताना या दोन्ही तालुक्यातच श्रीपाद नाईक यांना ५० हजारांपेक्षा अधिक मतांची लीड मिळेल, असा दावा केला. राज्यात विक्रमी मतदान होण्यासाठी भाजपने नेमलेल्या तब्बल ३४५०० पन्नाप्रमुखांचेही मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, 'निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही पन्नाप्रमुख नेमले. पन्नाप्रमुखांची २३८ संमेलने घेतली होती.